पुणे

पुणे :कसबा मतदारसंघ पोटनिवडणूक ; उत्साही वातावरणात मतदान

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सकाळी सहकुटुंब मतदान केंद्रांवर हजेरी लावली. मतदानाचा हक्क बजावला अन् सेल्फी काढून आपलाच उमेदवार निवडून येणार, असा दावा केला…. सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील अनेक केंद्रांवर असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. कसबा पेठेत रविवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तरुणाई, ज्येष्ठ नागरिकांसह महिलादेखील सकाळपासूनच मतदान करण्यासाठी येत होत्या. उन्हाचा पारा चढण्याआधी पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडल्याचे दिसले. सकाळी 10 वाजल्यानंतर प्रौढांचे प्रमाण वाढले. त्याचवेळी तरुणाईसुध्दा मोठ्या उत्साहाने येत असल्याचे दिसले.

काही तरुणांना 18 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त झाला होता. ते तरुणदेखील मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर आले. अकरा वाजल्यानंतर मात्र, पेठांमधील अनेक नागरिक सहकुटुंब येत असल्याचे दिसले. 5 ते 10 जणांच्या कुटुंबांचे ग्रुप येत होते. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर ते ग्रुप सेल्फी काढत होते. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत गर्दी ओसरली. त्यानंतर पुन्हा मतदान संपेपर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता. दिवसभर उमेदवारांसह, सेलिबि—टी, मोठे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या केंद्रांवर होत्या रांगा
बाजीराव रस्त्यावरील नूमवि मुलांच्या शाळेत आणि सरस्वती मंदिर शाळा येथे मतदान केंद्रे होती. याशिवाय, अप्पा बळवंत चौकाजवळील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, कन्या शाळा, नारायण पेठेतील गोगटे प्रशाला, शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळा, नवी पेठेतील ज्ञानप्रबोधनी, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे मतदान केंद्रे होती. या केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकांनी उपस्थित राहत मतदान केले. दुपारच्या वेळी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. परंतु, सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी होती.

दिव्यांगही मतदानासाठी हजर….
मध्यवस्तीत राहणार्‍या दिव्यांग नागरिकांनी रविवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रांवर हजेरी लावली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक दिव्यांगांनी त्यांच्या कुटुंबीयांना सोबत आणले होते. कोणी व्हीलचेअरवर, तर कोणी काठी टेकत-टेकत मतदान केंद्रांवर आले. मतदान केंद्रांवरील साहाय्यकांनीदेखील त्यांना तेथे गेल्यावर योग्य ती मदत केली, त्यामुळे मतदान झाल्यावर दिव्यांग नागरिक उत्साहाने घरी परतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT