सासवड: पुरंदर तालुक्यातील पश्चिम जिरायत भागातून वाहणारी कर्हा नदी सध्या कोरडीठाक पडली आहे. सध्या पश्चिम भागातील गराडे धरणात मृतसाठा आहे. त्यामुळे या नदीकाठावरील शेतीपिके धोक्यात आली आहेत. तसेच, पाणीपुरवठा योजनाही अडचणीत आल्या आहेत.
यंदा पावसाळ्यात गराडे येथील कर्हा नदीचा उगमस्थान चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कर्हा नदीला पाणी आले होते. त्यानंतर या नदीचे पाणी प्रवाहित झाले नाही. सध्या या नदीच्या काठावरील शेतीपिके धोक्यात आली आहेत.
या भागातील शेतीत सध्या ऊस, कांदा, गहू, पालेभाज्या आहेत. हे पीक विहिरीच्या पाण्यावर घेतले जाते. परंतु, विहिरीच्या पाण्याने तळ गाठल्याने सध्या पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकरी संजय कामठे, प्रकाश फडतरे, सुनील जगदाळे, किरण तरडे, सुरेश खवले, विठ्ठल चौधरी, श्यामराव लिंभोरे यांनी सांगितले. पिके वाळून गेल्यास उत्पादन खर्च वाया जाण्यासह आर्थिक अंदाजपत्रक कोलमडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तापमानवाढीमुळे पाण्याचे स्रोत आटले
गराडे परिसरात सध्या 40 ते 42 अंशांवर तापमान आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. मका, बाजरी, कांदा या रब्बी पिकांसह गव्हाला फटका बसला आहे. पाण्याअभावी चारा पिकांसह भाजीपाला लागवडी संकटात आहेत, असे मत अनेक शेतकर्यांनी व्यक्त केले. या नदीकाठावर असणार्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनाही अडचणीत आल्या आहेत.