शिक्रापूर : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील ढगेवाडी जवळील रस्त्यावर मंगळवारी (दि. 4) सकाळी सुमारास सात वाजता बिबट्यांचा कळप मुक्तपणे संचार करताना नागरिकांना दिसला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने अघटीत होण्याची वाट न पाहाता बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शिरुर तालुक्यातील जांबुत, पिपंरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेले आहेत. (Latest Pune News)
याची भीती परिसरातील नागरिकां मध्ये खोलवर रुजली आहे. या स्थितीत दुष्काळी परिसर असलेल्या कान्हूर मेसाई येथे बिबट्यांचा कळपच दिसून आला आहे. ढगेवाडी, कान्हूर मेसाई परिसरात अनेक विद्यार्थी दररोज पायी शाळेत जातात. आता मात्र पालकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे. आमची मुले शिक्षण घ्यावी की सुरक्षित राहावीत? असा प्रश्न पालक ग्रामस्थ विचारत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनाही सकाळ-संध्याकाळ कामावर ये-जा करताना बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. वन खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यातच वनविभागाकडून पिंजरा उपलब्ध नाही, असे कारण दिले जाते.