इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीसाठी 38 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र, काही लोक राजकारण करून तो निधी वाढवून द्या, अशी मागणी करतात. मात्र, जो निधी मंजूर झाला आहे, त्याचे काम तरी अगोदर सुरू केले पाहिजे. गेले 20 वर्षे नुसत्या घोषणा करायच्या आणि कामाच्या नावानं शून्य, हे कुठेतरी तपासण्याची गरज आहे, असे म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
कांदलगाव (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि. 12) आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 कोटी 92 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यानंतर गावात झालेल्या जाहीर सभेत आ. भरणे बोलत होते. आ. भरणे म्हणाले, निवडणुकीच्या काळात या गावात येऊन जातीपातीचे राजकारण करत गैरसमज निर्माण केल्यामुळे कांदलगाव-तरटगावातून माझ्यावर प्रेम कमी झाले, हे तुम्हीही मान्य केले पाहिजे आणि मीही समजून घेतलं पाहिजे असे सांगत आमदार भरणे यांनी मतदारांचे कान टोचलेत.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सतीश पांढरे, सचिन सपकळ, दीपक जाधव, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, पोपट शिंदे, अमर गाडे यांसह कांदलगाव- तरटगांवातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश बाबर, समाधान जगताप, सागर जगताप, सहदेव सरडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वसंत आरडे यांनी केले तर आभार अॅड. नितीन भोसले यांनी मानले.
इंदापूर तालुक्यात जो विकास आमदार भरणेंच्या माध्यमातून झाला, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यामुळे झाला. अजित पवार सत्तेत बसल्यानंतर विकास पाहिजे तिथे आला. मामा आमदाराचे मंत्री झाले आणि काय चमत्कार घडला या तालुक्यातील वाडीवस्तीने पाहिला. बारामती, इंदापूर हे वेगळे नाते आहे. दादांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर भविष्यात तुम्हाला यावे लागेल, सत्य सांगावे लागेल. भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
या तालुक्याने मला आमदार केले. काल मी कुठेतरी चर्चा ऐकली की दत्तात्रय भरणे हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत किंवा मैदानात उतरतील. परंतु, मी खासदार व्हावं हे माझ्या आयुष्यात कधीही डोक्यात नाही. विधानसभेपुरतच माझं बरं आहे. कशाला लोकसभा आणि काय करायचं. तुमची सेवा हीच माझी सेवा आहे. ज्याला लोकसभेला राहायचे त्यांना राहू द्या. आपल्याला त्यात पडायचं नाही, असे म्हणत आमदार भरणे यांनी लोकसभेच्या चर्चेंना पूर्णविराम दिला.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मागण्यानुसार आ. भरणे यांनी ओपन जीम पेव्हर ब्लॉकसाठी 5 लाख, बंदिस्त गटार लाईनसाठी 10 लाख, जोगेश्वरी मंदिर ते शंभूराजे चौकापर्यंत काँक्रीट रस्ता करण्यासाठी 50 लाख, दफनभूमी संरक्षक भिंत सुशोभीकरण 20 लाख, स्मशानभूमी संरक्षक भिंत सुशोभीकरण 20 लाख, जोगेश्वरी मंदिर सभामंडप सुशोभीकरण 10 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली. कांदलगावला चारही बाजूने पाणी आहे याचा विचार करता भविष्यात या परिसरात पर्यटन विकास करावा, अशी मागणी तरुणांनी केली, यासही भरणे यांनी समर्थन दर्शविले.
हेही वाचा