कामशेत : शिवानंद कांबळे : मावळातील करंजगाव येथे शंभर वर्षाहून अधिक काळ कमळाचे तळे अस्तित्वात आहे. या तलावात बाराही महिने कमळे फुलतात;
मात्र सध्या या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तळ्याची दुरवस्था झाली असून, या तळ्याचे सुशोभीकरण कधी होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
करंजगाव येथील हे तळे साधारण एक एकर जागेमध्ये व्यापले आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वीचे तळे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेली अनेक वर्ष तळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
यामध्ये प्रमाणात गाळ साचलेला आहे. तळ्याची साठवण क्षमता कमी झाल्याने गाळामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. त्यामुळे सुंदर तळ्याची दुरवस्था झाली आहे.
तळ्यामुळे परिसराचे वातावरण आल्हाददायक होवून जाते. या वातावरणामुळे अनेक पक्षीदेखील परिसरात आढळून येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
तळ्याचे सुशोभीकरण केल्यास तळे व इथल्या परिसराचे संवर्धन होवू शकेल. परिसर सुशोभीत झाल्यास पर्यटकांची वर्दळ वाढेल. जेणेकरून त्या माध्यमातून नाणे मावळातील नागरिकांना रोजगार मिळू शकेल. शकतो येथील गावामध्ये आर्थिक उलाढाल वाढू शकते.
तसेच त्या कमळांच्या फुलांचाही व्यवसाय होऊ शकतो. यातून आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. तसा प्रशासनाने या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.