खाटा वाढवल्याचा नुसताच ‌‘गाजावाजा‌’; प्रत्यक्षात बेड कार्यान्वित नाहीत Pudhari
पुणे

Kamla Nehru Hospital Pune: खाटा वाढवल्याचा नुसताच ‌‘गाजावाजा‌’; प्रत्यक्षात बेड कार्यान्वित नाहीत

कमला नेहरू रुग्णालयातील स्थिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नोटीस पाठविली. महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कमला नेहरू रुग्णालयातील खाटांची संख्या कमी असल्याकडे एनएमसी लक्ष वेधले. त्यानंतर रुग्णालयात 100 खाटा वाढवल्याचा गाजावाजा महाापालिकेकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात, मनुष्यबळाचा अभाव आणि अपुरे काम यामुळे खाटा अद्याप वापरात आलेल्या नाहीत.

कमला नेहरू रुग्णालयात एकूण 420 खाटा आहेत. मागील वर्षी महापालिकेची पाच महत्त्वाची रुग्णालये अद्ययावत करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालयात खाटा वाढवणे, मोड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करणे आदींवर चर्चा झाली. (Latest Pune News)

प्रत्यक्षात, अद्ययावतीकरणाची योजना कागदावरच राहिली. त्यानंतर पुन्हा रुग्णालयातील खाटा वाढवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधीच मनुष्यबळाची कमतरता असताना नवीन खाटा कशा कार्यान्वित करणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

जानेवारी 2025 पासून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अनेक कारणे दाखवा नोटिशी बजावल्या आहेत. पीएमसी-मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट (पीएमसी-एमईटी) मार्फत चालवले जाणारे हे महाविद्यालय कमला नेहरू रुग्णालयाशी संलग्न आहे.

एनएमसीने रुग्णालयातील कमी खाटा आणि कमी रुग्णसंख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे, खाटा वाढवण्याचे आदेश दिले. खाटा वाढवण्यासाठी रुग्णालयातील वेगवेगळ्या मजल्यावरील मोकळ्या जागा निवडण्यात आल्या आहेत. यापैकी काही खाटा ऑक्सिजनसहित असणार आहेत.

कमला नेहरू रुग्णालयात 100 नवीन खाटा वाढविण्यात आल्या आहेत. एनएमसीच्या निकषांची पुर्तता करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये खाटा प्रत्यक्षात कार्यान्वित केल्या जातील.
- प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
एनएमसीच्या निकषांनुसार विविध विभागांमध्ये खाटा वाढवल्या जात आहेत. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- डॉ. निना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT