वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम व पूर्व पट्ट्याला तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागास वरदान ठरलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होत असल्याची माहिती धरण प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी दिली आहे. सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील १०० टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कळमोडी धरण मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून ३२ क्युसेकने पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. या धरणात सन २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली होती. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून वेगाने पाणी वाहण्यास सुरुवात होते. कळमोडी धरण परिसरात पावसाचा समाधानकारक जोर असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले. धरणात ४२.८७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १.५१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कळमोडी धरण भरल्याने चासकमान धरणाचा जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
गतवर्षी धरण २१ जुलै रोजी भरले होते. या वर्षी २७ दिवस अगोदर २४ जून रोजी हे धरण भरले. कळमोडी धरण व परिसरात एक जूनपासून ३८३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, देवोशी व अंतर्गत कुडे, बांगरवाडी, येनिये, घोटवडी या गावातलासुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पश्चिम भागातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा या निमित्ताने सुटला आहे.
दरम्यान धरणांतर्गत असणारा दगडांचा मोठा साठा बाहेर काढण्याची मागणी तसेच चिखलगाव, डामसेवस्ती येथे पूल कम बंधारा बांधण्याची मागणी कळमोडी प्रकल्प संघ समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे व ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने केली जात आहे.
नदीखालील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रातील शेतीविषयक औजारे अथवा तत्सम साहित्य, जनावरे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना प्रशासनाच्या देण्यात आल्या आहेत.