पुणे

पुणे : दहशत माजविणार्‍या कुडले, काजळकरला अखेर बेड्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका सोहळ्याप्रसंगी बॅनरवर फोटो लावला नसल्याच्या रागातून कोथरूड येथील शास्त्रीनगर भागात तलवार फिरवत दहशत निर्माण करणार्‍यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने पवना डॅमजवळील तुंगी डोंगर परिसरातून बेड्या ठोकल्या. मागील तीन दिवसांपासून गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर होती. ओंकार ऊर्फ बाबा कुडले (रा. कोथरूड), अशोक बाळकृष्ण काजळकर (30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्षय बाबासाहेब गायकवाड (वय 22, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. एका सोहळ्याप्रसंगी बॅनवर फोटो का लावला नाही, म्हणून कुडले याने हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजविली होती.

स्वतः पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस उप आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर होती. कुडले त्याच्या सहकार्‍यासह तुंगी डोंगराच्या जंगलात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस निरीक्षक गणेश माने, खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, अंमलदार शंकर संपते, मनोज सांगळे, संजय आढारी, वैभव रणपिसे, अशोक शेलार, किरण ठवरे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT