पुणे: जुन्नर परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या चार वर्षांत 11 व्यक्तींसह 10 हजार पशुधनाचा जीव गेला आहे. बिबट्याचे हल्ले रोखणे, प्रथमोपचार, मदतकार्य करण्याच्या द़ृष्टिकोनातून सुमारे 400 जणांना प्रशिक्षण देऊन वन आपदा मित्र तयार केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
जुन्नर बरोबरच आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यात 400 ते 450 बिबटे संचार करत असल्याची शक्यता आहे. दिवसाढवळ्या हे बिबटे वावरत असल्याने शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. बिबट्यांचे हे हल्ले रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जुन्नर उपवन संरक्षण अधिकारी यांच्या वतीने या वन आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वन विभागाच्या वतीने 400 वन आपदा मित्रांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात गुरुवारपासून (दि. 13) होणार आहे. या 400 वन आपदा मित्रांचे प्रशिक्षण मार्च अखेरपर्यंत पार पाडण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन मास्टर आणि वन विभागाचे मास्टर या 400 वन आपदा मित्रांना प्रशिक्षण देणार आहेत. वनसंरक्षक दलाच्या जवानांची मदत हे वन आपदा मित्र करतील. हल्ला रोखणे, प्रथमोपचार, दोरांना गाठी बांधणे, विहीरीत उतरणे आदी गोंष्टीचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने यापूर्वी विविध आपत्तीसाठी 500 आपत्ती मित्रांना प्रशिक्षण दिले आहे. यात सर्प मित्र, आगीच्या घटना रोखण्यासाठी, पिसाळलेल्या प्राण्यांसदर्भात काम करण्यासाठी सुमारे 500 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
येथे दिले जाणार प्रशिक्षण
वनविभागाच्या आंबेगावमधील भीमाशंकर अॅग्रोटुरिझममध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 70 जणांचा एक समूह करण्यात येणार असून, सहा दिवस या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वन आपदा मित्रांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहेत.
जुन्नरबरोबरच आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यांतील 400 जणांना वन आपदा मित्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वन आपदा मित्रांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे.- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी.