Pudhari
पुणे

Onion Crop Damage : बराखीत युरिया टाकल्याने 400 पिशव्या कांदा सडला; माथेफिरूच्या कृत्याने लाखोंचे नुकसान

या घटनेमुळे सुमारे 400 गोण्या कांदा सडल्याने अंदाजे 3 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वडज येथील सरपंच सुनील चव्हाण यांच्या शेतातील कांद्याच्या बराखीत अज्ञात माथेफिरू व्यक्तीने युरिया टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सुमारे 400 गोण्या कांदा सडल्याने अंदाजे 3 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, चव्हाण यांनी नाइलाजाने हा सडलेला कांदा ओढ्यात टाकून दिला. (Pune Latest News)

याबाबत समजलेली माहिती अशी की, वडज गावचे सरपंच सुनील चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये कांदा साठवण्यासाठी नवीन बराख तयार करून हवा खेळतल राहावी यासाठी बराखीला लोखंडी जाळी लावली होती. बराखीत साठवलेल्या कांद्याला मोकळी हवा मिळत असल्याने चार महिन्यांपूर्वी साठवलेला कांदा चांगल्या स्थितीमध्ये होता.

चव्हाण यांनी त्यांच्या शेतातील बराखीत 4 महिन्यांपूर्वी कांदा साठवला होता. बुधवारी (दि. 6) सकाळी ते बराखीकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना बराखीतून पाणी वाहत असल्याचे दिसले. त्यांनी आत पाहणी केली असता कांद्यात युरिया टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे बहुतांश कांदा सडून गेला होता. एकूण 400 पिशव्यांपैकी केवळ 50 पिशव्यांतील कांदा वापरण्यायोग्य असल्याचे दिसून आले, तर उर्वरित संपूर्ण कांदा फेकून द्यावा लागला. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित घटनेची तपासणी व दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT