पुणे

पुणे : पीएमपी तयार करणार संयुक्त सर्वेक्षण आराखडा

अमृता चौगुले

प्रसाद जगताप
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भाग आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात पीएमपीची सेवा सुरू आहे. या सर्व ठिकाणी सेवा पुरविली जात असल्यामुळे पुणेकरांसाठी बस अपुर्‍या पडत आहेत. त्यातच शहराबाहेर बस चालविल्यामुळे खर्चाचा बोजा देखील वाढत आहे. याचा सविस्तरपणे अभ्यास करून संचलन तूट कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासन आता संयुक्त सर्वेक्षण आराखडा (रिअल टाइम सर्व्हे) तयार करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 10 तारखेला पीएमपीचे अध्यक्ष पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांशी
चर्चा करणार आहेत.

पीएमपीचे पहिले उद्दिष्ट आहे ते शहरातील नागरिकांना सार्वजनिक सेवा पुरविणे. परंतु, 'पुम्टा'च्या बैठकीत ठरल्यानुसार पीएमआरडीए हद्दीत पीएमपी प्रशासनाला सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे अगोदरच ताफ्यात गाड्या कमी असताना पीएमआरडीए हद्दीत सेवा पुरवावी लागत आहे. परिणामी, पुणेकरांना गाड्या अपुर्‍या पडत असून, पीएमपीच्या खर्चात वाढ होत आहे.

तसेच, गाडी लांब पल्ल्यासाठी धावल्यामुळे या गाड्यांची झीज होऊन त्यांचे आयुर्मान घटत आहे. गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्च आणि इंधन खर्चसुद्धा वाढत आहे. या सर्व कारणांमुळे पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया हे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए भागात नियोजनबद्ध सेवा पुरविण्यासाठी एक संयुक्त सर्वेक्षण आराखडा तयार करणार आहेत.

अधिकार्‍यांशी करणार चर्चा…
पीएमआरडीए भागात पीएमपीची सेवा पुरविली जात आहे. मात्र, पीएमआरडीएकडून पीएमपीला ना संचलन तूट दिली जात आहे, ना बस खरेदी करण्यासाठी निधी दिला जात आहे, ना बस पार्किंगसाठी डेपोची जागा. त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष येत्या 10 तारखेला पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर आराखडा तयार करण्यात येणार आहे.

प्रशासनाचा प्रतिसाद नाहीच
पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीला दरवर्षी संचलन तूट म्हणून काही रक्कम दिली जाते. मात्र, दरवर्षी या संचलन तुटीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे कारण पीएमपी प्रशासन पुणे शहराबाहेर सर्रासपणे आपली सेवा वाढवत आहे. या सेवेच्या बदल्यात पीएमआरडीएने संचलन तूट म्हणून 35 टक्के रक्कम द्यावी. याकरिता पीएमपी प्रशासनाने यापूर्वी पीएमआरडीए प्रशासनाला अनेकदा पत्रे देखील दिली आहेत. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

  • शहराबाहेर सुरू असलेले पीएमपीचे एकूण मार्ग – 104 (दोन्ही मनपा हद्द)
  • पूर्वीचे ग्रामीण हद्दीतील मार्ग – 57
  • नव्याने सुरू करण्यात आलेले मार्ग – 47
  • शहरात धावत असलेल्या गाड्यांची संख्या – 1290
  • शहराबाहेर धावत असलेल्या गाड्यांची संख्या – 460
  • देखभाल दुरुस्ती, ब—ेकडाऊनसाठी स्पेअर गाड्या – 436

दृष्टिक्षेपात
पुणेकरांना लोकसंख्येनुसार आवश्यक बससंख्या : 3 हजार 500
सध्या पीएमपीकडे असणार्‍या गाड्या : 2 हजार 142
शहराची लोकसंख्या : 40 लाखांपेक्षा अधिक
1 लाख लोकसंख्येसाठी आवश्यक बससंख्या : 55

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागात पीएमपीची सेवा सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पीएमपीच्या बसगाड्या अपुर्‍या पडतात आणि संचलन तूटही वाढत आहे. त्यामुळे आम्ही आता रिअल टाइम सर्व्हे करणार आहोत. त्यामुळे बचत होऊन आणि प्रवाशांना वेळेत सुविधा पुरविता येईल. त्यानुसार कमी उत्पन्न देणार्‍या मार्गांवरील बस बंद करून ज्या ठिकाणी प्रवाशांची जास्त गर्दी, त्या ठिकाणी वाढविल्या जातील.
                                                                   -ओमप्रकाश बकोरिया,
                                                  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

SCROLL FOR NEXT