पुणे: शहरातील पार्किंगच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रमुख सहा रस्त्यांवर पे- ॲण्ड- पार्क, नो- पार्किंग आणि नो- हॉल्टींग झोनचा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याचबरोबर, जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ महापालिकेने तब्बल दोन कोटी रुपये खर्चून बांधलेले, पण 17 वर्षांपासून बंद असलेले बहुमजली यांत्रिक वाहनतळ पुन्हा सुरू केला जाणार आहे. (Latest Pune News)
या वाहनतळासाठी दोन कंपन्यांकडून प्रस्ताव आले आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पार्किंग प्रकल्प महापालिका व मेट्रो प्रशासन यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली चालविण्यात येईल. मेट्रो स्टेशनजवळ असल्यामुळे हे वाहनतळ मेट्रो प्रवाशांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला पार्किंगचा प्रश्न कारणीभूत ठरत असून, विशेषतः जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता आणि अंतर्गत भागांमध्ये नाट्यगृहे, हॉटेल्स, शासकीय कार्यालये व व्यापारी आस्थापनांमुळे पार्किंगचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागते. स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे.
पार्किंगच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी संभाजी महाराज उद्यानासमोर बहुमजली यांत्रिक वाहनतळ उभारला होता. सुरुवातीला हे वाहनतळ चालवले गेले, मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते बंद पडले. त्यानंतर महापालिकेने अनेकदा निविदा काढल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आता मेट्रोच्या वाढत्या वापरामुळे या वाहनतळाचा पुनर्वापर करण्यास प्रशासन पुढे आले आहे.
नागरिकांची होणार सोय
वाहनतळाच्या वैशिष्ट्यांमध्ये तिसऱ्या मजल्यापर्यंत पार्किंगची सोय, लिफ्टद्वारे वाहन उचलण्याची सुविधा आणि 80 चारचाकींची क्षमता आहे. दुरुस्ती झाल्यानंतर हे वाहनतळ कार्यान्वित झाले, तर नागरिकांची मोठी अडचण दूर होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे