पुणे; पुढारी वृत्तसेवा : गिरिप्रेमीचा गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी 17 मे रोजी जगातील सातव्या क्रमांकाच्या धौलागिरी या शिखरावर यशस्वीरीत्या भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकाविला. हे त्यांचे सहावे 8 मीटर उंचीचे शिखर आहे, त्यांनी याआधी गेल्या चार वर्षांमध्ये माउंट एव्हरेस्ट, माउंट ल्होत्से, माउंट कांचनजुंगा, माउंट अन्नपूर्णा-1 आणि माउंट मनासलू या शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. नेपाळ हिमालयात वसलेले धौलागिरी हे जगातील सातवे उंच शिखर असून, चढाईसाठी अत्यंत कठीण मानले जाते.
माउंट धौलागिरीमध्ये हिमप्रपात, प्रचंड अनिश्चित हवामान, तीव्र चढाई, कायमचे उणे तापमान यांसारखी अनेक आव्हाने आहेत. या वर्षींचे लहरी हवामान आणि सततच्या हिमवृष्टीमुळे चढाई अधिकच कठीण झाली होती. बेस कॅम्प ते कॅम्प 2 पर्यंत संघाला सुमारे चार फूट उंच साठलेल्या बर्फातून चढाई करावी लागली.
या मोहिमेला डॉ. पी. डी. पाटील आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भूषण हर्षे आणि डॉ. सुमित मांदळे, गणेश मोरे यांनी जितेंद्र यांना योग्य ते हवामानाचे अंदाज पुरवत त्याच्या प्रयत्नांना आकार दिले. धौलागिरीपाठोपाठ आता लगेचच गवारे जगातील पाचव्या क्रमांकाच्या माउंट मकालू या आणखी एका दुर्गम श्री शिखरावर चढाई करण्याच्या तयारीत आहेत.