पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून पदोन्नती करण्यात आली असून, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातार्याच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. दरम्यान, डुडी यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार गुरुवारी सायंकाळी स्वीकारला. डुडी यांनी राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून बीटेक (संगणकशास्त्र) पदवी घेतली आहे.
2016 पासून प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर 2017 मध्ये झारखंड जिल्ह्यातील धनबाद येथे सहायक जिल्हाधिकारीपदी, तर 2018-19 मध्ये झारखंडमधील सिमरिया जिल्ह्यातही त्यांनी काम केले. 2019 मध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी काम केल्यानंतर 2019-20 मध्ये पुणे जिल्ह्यातील मंचर-घोडेगाव येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्यानंतर सांगलीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर गेल्या वर्ष-दीड वर्षापासून डुडी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. गेल्या वर्षीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पुणे विभागात डुडी यांना सन्मानित करण्यात आले होते.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आयएएस पूजा खेडकर बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते. देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दिवसे यांना पदोन्नती देत रिक्त असलेल्या राज्याच्या जमाबंदी आयुक्त तसेच भूमिअभिलेख विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.