सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन स्वीकृत संचालकांची मुदत 28 जानेवारीला संपत असून, या ठिकाणी वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. 'सोमेश्वर'च्या संचालकपदावरून पुरंदर आणि बारामती तालुक्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या अगोदर तुषार माहुरकर (माहुर, ता. पुरंदर) आणि अजय कदम (ता. खंडाळा) यांची स्वीकृत संचालकपदावर वर्णी लागली होती. संचालक मंडळाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी संचालकपदाची मागणी केली होती. त्या वेळी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळण्याची आशा आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
निवडणुकीत सर्वांनाच उमेदवारी शक्य नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळात जुन्या-नव्या व तरुणांचा मेळ घातला होता. नुकत्याच तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज पदाधिकार्यांना झटका देत ग्रामपंचायत निवडणुकीत उच्चशिक्षित तरुण विजयी झाले आहेत. याचाही विचार पवार करतील, अशी आशा तरुणांना आहे. नवख्या तरुणांना संधी मिळणार की जुन्या जाणकारांचा मेळ पवार घालणार, याकडे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची पर्यायाने अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. राज्यातील अग्रेसर असलेल्या सहकारी साखर कारखान्यात 'सोमेश्वर'ची गणना होते. त्यामुळे कारखान्यात संचालकपद मिळावे, यासाठी अनेक जण इच्छुक असतात. वारंवार मागणी करूनही पक्षाने तिकीट दिले नसल्याने आणि पक्षाशी एकनिष्ठ असूनही नाकारले जात असल्याचे पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे अशा पदाधिकार्यांना स्वीकृतपदी संधी देऊन पवार नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील. गेल्याच महिन्यात अजित पवार यांनी 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदी महिला संचालकांची निवड करीत धक्कातंत्राचा वापर केला होता. त्यामुळे स्वीकृत संचालक निवडणुकीतही पवार असाच धक्का देतात का? हे लवकरच समजणार आहे.