Jejuri Wari Accident Pudhari
पुणे

Jejuri Wari Accident: आषाढी वारीवर दु:खाचा डोंगर! जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; सहा जण जखमी

Jejuri Wari Accident: आषाढी वारीदरम्यान जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Jejuri Wari Accident: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारीत आज सकाळी दुर्दैवी घटना घडली. पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ भोंगळे मळा परिसरात ट्रकने वारकऱ्यांच्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वारीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो आणि पायी चालणारे वारकरी जेजुरीकडे जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने वारकऱ्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की अनेक वारकरी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला सहा वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती होती. मात्र उपचारादरम्यान तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रविवारी जेजुरी मुक्कामी होती. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी सकाळी पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान हा अपघात घडल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय, ट्रकचालकाचा निष्काळजीपणा होता का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीसारख्या श्रद्धेच्या सोहळ्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरातील वारकरी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT