पुणे

जेजुरीकर आंदोलकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

अमृता चौगुले

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरीत देवसंस्थान विश्वस्त नियुक्तीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असून, याबाबत आंदोलकांनी मुंबई येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेत आपण हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन ठाकरे यांनी जेजुरीकरांना दिले आहे.

जेजुरीत रविवारी दहाव्या दिवशीही याप्रश्नी उपोषण सुरूच आहे. सकाळी आंदोलक माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, जयदीप बारभाई, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, नगरसेवक अजिंक्य देशमुख, संतोष खोमणे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर, कृष्णा कुदळे, नीलेश जगताप आदींनी ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन खंडोबादेवाचे प्रतीक म्हणून घोंगडी आणि भंडार कोटमा देऊन सत्कार केला.

आंदोलनाबाबत माहिती दिली. मागण्यांचे निवेदनही ठाकरे यांना देण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत राज ठाकरे यांनी झालेल्या निवडी ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मात्र, राज्याचे न्यायविधीमंत्री खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलून घेतो. सध्याचे विश्वस्त मंडळ सात जणांचे आहे. यात घटनादुरुस्ती करून 7 ऐवजी 11 जणांचे करण्याबाबत प्रयत्न करू व त्यात स्थानिकांना प्राध्यान्य देण्यबाबत आग्रही राहू, असे आश्वासन दिले आहे.

विश्वस्तांची बैठक घेण्यास विरोध

दरम्यान, नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सातही विश्वस्तांनी एकत्र येऊन बैठक घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा विरोध पाहून विश्वस्तांनी जेजुरी पोलिस ठाण्याचा आश्रय घेतला होता. या वेळी आंदोलक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत विश्वस्तांचा निषेध केला. विश्वस्तांनी बैठक घेतल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे. नवनिर्वाचित विश्वस्तांविरोधात ग्रामस्थांचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे 'रिव्ह्यू पिटीशन' दाखल असताना हे विश्वस्त बैठक घेऊ शकत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर बाबी न पाळता बेकायदेशीर बैठकीला ग्रामस्थांचा विरोध असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ढोल वाजवून कोल्हाटी डोंबारी समाजाचे आंदोलन

श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत देवसंस्थानच्या विश्वस्त निवडीच्या निषेधार्थ सुरू असलेले धरणे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच होते. रविवारी (दि. 4) अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाजाने संत लाखा कोल्हाटी यांचा ढोल वाजवून, मोर्चा काढत धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निषेध केला. जेजुरी देवसंस्थान ट्रस्टवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्थानिकांना डावलून बाहेरगावच्या व्यक्तींची विश्वस्तपदी नियुक्ती केली आहे. या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने सलग दहाव्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे.

रविवारी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी व डोंबारी समाज संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून समाजाचा पारंपरिक ढोल वाजवून शहरातून फेरी काढण्यात आली. राष्ट्रीय संत काशिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनखाली जेजुरीत कोल्हाटी समाज संघटित झाला आहे. जेजुरी शहरातील कोल्हाटी समाज हा खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे खांदेकरी व मानकरी आहेत.

जेजुरी देवसंस्थान ट्रस्टवर स्थानिक विश्वस्त असावेत, या मागणीसाठी कोल्हाटी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. समाजाचे नेते दशरथ लाखे, रोहिदास दावळकर, किरण दावलकर, रोहित लाखे, देविदास कुदळे, चंद्रकांत लाखे, तुषार कुदळे, कुंडलिक लाखे, राजेंद्र दावलकर तसेच ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT