Jejuri Khandoba Somvati Yatra Pudhari
पुणे

Jejuri Khandoba Somvati Yatra: जेजुरीच्या खंडोबाच्या सोमवती यात्रेत भंडाराची उधळण! ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने गड दुमदुमला

पहाटे पाच वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ; कऱ्हा स्नान आणि कुलधर्म-कुलाचारासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

नितीन राऊत

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रे निमित्त देवदर्शनासाठी आणि क-हा स्नान,कुलधर्म-कुलाचारासाठी मोठ्या संख्येने भाविकांनि गर्दी केली होती. यावेळी खंडेरायाच्या पालखी सोहळ्यावेळी जेजुरी गडावर भाविकांनी भंडाराची उधळण करीत, सदानंदाचा येळकोट...येळकोट -येळकोट जयमल्हार असा जयघोष केला.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर वर्षाकाठी आठ ते दहा यात्रा भरतात. या यात्रे मध्ये सोमवती यात्रा हि पर्वकाळ समजली जाते. या सोमवती यात्रे निमित्त जेजुरी गडावरून श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा काढला जातो गडापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कऱ्हा नदीवरील पापनाश तीर्थावर या उत्सव मूर्तींना पंचामृत व कर्हेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते हा अवर्णीय सोहळा पौराणिक काळापासून सुरु आहे.

सोमवती यात्रेच्या निमित्ताने रविवार पासूनच राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनि कुलधर्म-कुलाचार व देवदर्शनासाठी गर्दी होती. सोमवार दि 9 रोजी अमावस्या दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी संपणार असल्याने पहाटे चार वाजता गडाच्या पायथ्याशी जमलेले देवाचे मानकरी पालखी सोहळ्याचे खांदेकरी वाजतगाजत गडावर आले .पहाटे पाच वाजता देवाचे मानकरी इनामदार राजेद्र पेशवे ,सचिन पेशवे व खोमणे माळवदकर पाटील यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फेरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखी समोर निशाण,छत्र-चामर–अब्दागिरी तसेच घडशीसमाज बांधवांच्या वतीने सोहळ्यापुढे सनईचे मंगलमय सूर निनादत होते. मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेण असणारा पिवळ्या जर्द भांडाराची उधळण केली.

संपूर्ण गड परिसर भंडाराने न्हाऊन निघाला यावेळी देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्येय भाविकांनी यावेळी अनुभवला.यावेळी पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी ,तसेच समस्त पुजारी, सेवेकरी,खांदेकरी,मानकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते. हा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी कऱ्हा नदीवर मार्गस्थ झाला असून दुपारी बाराच्या आता कऱ्हा स्नान सोहळा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT