जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: जेजुरी गडाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा, देवसंस्थानच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने करण्यात आली. पुजारी सेवक वर्ग, भाजपा, तसेच नियोजित राष्ट्रीय महामार्ग अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी विविध मागण्यांची निवेदने या वेळी सीतारामन यांना दिली. शुक्रवारी( दि. 23) जेजुरी गडावर जाऊन सीतारामन यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले, त्या वेळी या मागण्या करण्यात आल्या. सीतारामन यांचा बालद्वारीत सत्कार करण्यात आला. त्या वेळी आपण खंडोबा देवाचे दर्शन आणि प्रसाद घेतला आहे.
आता सत्कार नको, असे सांगून त्यांनी सत्कार स्वीकारले नाहीत. या कार्यक्रमावेळी जेजुरी गडाची धार्मिक व ऐतिहासिक माहिती विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी दिली. देवसंस्थानच्या वतीने सॉलीसीटर प्रसाद शिंदे यांनी तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यासाठी महाराष्ट्र शासनाने 350 कोटी रुपये विकासनिधी मंजूर केला असून त्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून 117 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध व्हावा, तसेच देवसंस्थानच्या वतीने उभारण्यात येणार्या हॉस्पिटल, भक्त निवास व विकासकामांसाठी केंद्र शासनाच्या वतीने 300 कोटीचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.
पुजारी सेवकवर्गाच्या वतीने आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, पुजारीवर्गाला शासनाने मानधन सुरू करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जेजुरी शहर भाजपच्या वतीने प्रसाद अत्रे, सचिन पेशवे यांनी जेजुरी कडेपठार, जेजुरीगड व अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तूंचे वाराणशी, उज्जेन,अयोध्याच्या धर्तीवर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास व्हावा, अशी मागणी केली. तर जेजुरी शहरातून जाणार्या नियोजित राष्ट्रीय महामार्गासाठी केवळ एकाच बाजू अधिग्रहण केली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जागा अधिग्रहण करावी, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.