पुणे; पुढारी वृत्तसेवा : मतांचे ध्रुवीकरण होणार नाही, ते कर्नाटकच्या मतदारांनी दाखवून दिले आहे. शेजारच्या घरात आलेलं वारं हे आपल्याही घरात येणार आहे, याचा अंदाज त्यांना येत नाही. महाराष्ट्रात भाजप कितीही ओरडत असला तरी त्यांच्या साठच्या वर जागा येणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पाडला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, महविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवून आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीनेच लढावी, असा आग्रह माझ्याकडे करण्यात आला. या मागणीसंदर्भात मी सर्वच कार्यकर्त्यांना सांगितले की, शहरात शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना विश्वासात घेऊन एकमत होऊनच इथे उमेदवार दिला जाईल.
मेळाव्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेसाठी उभे राहात असतील तर कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून आणू आणि फडणवीसांना त्यांची जागा दाखवून देतो, असे जाहीर केले. यावर पाटील म्हणाले, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी असली तरी आघाडीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शरद पवार यांच्या आदेशानंतर निर्णय घेतला जाईल. आघाडीतील नेत्यांमध्ये लोकसभेचा चेहरा कोण यापेक्षा किती जागा आणणार यावर जोर दिला जात आहे. निकालानंतर तिन्ही पक्षप्रमुख ठरवतील तोच आघाडीचा नेता असेल.