पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक देखील निघणार आहे, अशी माहिती मंडळाचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली. (Latets Pune News)
गणेश चतुर्थीला सकाळी गणरायाची आरती होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरूवात होईल. सुरुवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल-ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. श्री गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजतगाजत निघणार्या मिरवणुकीनंतर प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्याजया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे.- पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट