पुणे

पुणे : जलपर्णी पंधरा दिवसांत हटविणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील जलस्त्रोतांमध्ये वाढणारी जलपर्णी काढण्याचे काम आरोग्य, वाहन आणि ड्रेनेज विभागानंतर ते पर्यावरण विभागावर सोपविण्यात आले आहे. दरम्यान, हे दोन्ही विभाग सध्या काम करत असून, पंधरा दिवसांत ते पूर्ण करण्याचे आदेश अधिकार्‍यांनी दिले आहेत. शहरात मुळा-मुठा नदी, कात्रज तलाव, जांभूळवाडी तलाव, पाषाण तलाव, मुंढवा जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढते. दर वर्षी ही जलपर्णी काढण्यासाठी सुमारे दीड ते दोन कोटींच्या निविदा काढल्या जातात.

निधीही कमी पडल्यास तात्पुरत्या निविदा काढल्या जातात. जलपर्णी काढण्याचे काम पूर्वी आरोग्य विभागाकडे होते. त्यानंतर ते वाहन विभागाकडे देण्यात आले. मात्र, वाहन विभागाने काढलेल्या निविदा वादात सापडल्यानंतर हे काम पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य विभागाकडे देण्यात आले. त्यानंतर हे काम ड्रेनेज विभागाकडे देण्यात आले. ड्रेनेज विभागाकडूनही जलपर्णी काढण्याचे काम योग्य पद्धतीने केले जात नसल्याने आता हे काम एप्रिलपासून पर्यावरण विभागावर सोपविण्यात आले आहे. पर्यावरण विभागाकडून जलपर्णी काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.

तत्पूर्वी शहरातील नदी तसेच तलावांमधील जलपर्णी काढण्यासाठी ड्रेनेज विभागाने काढलेल्या निविदेची मुदत 31 मार्च रोजी संपणार होती. या निविदेतून केवळ 60 टक्के कामे झाली असून, मुदतीत जलपर्णी न निघाल्यास पुणेकरांना जलपर्णीमुळे यंदाही उन्हाळ्यात डास तसेच दुर्गंधीचा सामना करावा लागू नये, यासाठी पर्यावरण विभाग व ड्रेनेज विभागाकडून सध्या जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जांभुळवाडी तलावातील जलपर्णी काढण्याचे काम संपले असून कात्रज, पाषाण तलाव आणि नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

शहरातील तलावांमधील जलपर्णी काढण्याचे काम सध्या सुरू असून मुंढवा जॅकवेलजवळील जलपर्णी काढण्याचे आदेश दिले आहेत. जलपर्णी काढण्याची सर्व कामे पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे व त्यानंतर जलपर्णी वाढणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

                           – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

SCROLL FOR NEXT