पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगावनजीकच्या परधाडे रेल्वेस्थानकानजीक घडलेली घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत १३ प्रवासी जागीच ठार झालेत. १० जणांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटत नाही, शरीराचे तुकडे झाले आहेत. निव्वळ अफवेमुळेच ही घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गुरूवारी पुणे येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, रेल्वे दुर्घटनेनंतर प्रशासन आणि इतर दलांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. श्रावस्ती येथील उधळ कुमार आणि विजय कुमार ट्रेनमध्ये होते. ते जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते आणि वरच्या बर्थवर बसले होते. पेंट्रीमधील एका चहा विक्रेत्याने बोगीमध्ये आग लागल्याचे ओरडून सांगितले. त्या दोघांनीही ते ऐकले आणि आरडाओरड सूरू केली. काही प्रवाशांनी आगीपासून वाचण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. पण ट्रेन वेगाने जात होती म्हणून एका व्यक्तीने चेन ओढली आणि ट्रेन थांबली. अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि रेल्वे ट्रॅक ओलांडू लागले. त्याचवेळी कर्नाटक एक्सप्रेस ही दुसरी ट्रेन खूप वेगाने आली आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांना धडकली. आतापर्यंत १३ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी १० जणांची ओळख पटली आहे तर इतर ३ जणांची ओळख पटलेली नाही. एकूण जखमींमध्ये १० जणांचा समावेश आहे, त्यात ८ पुरुष आणि २ महिला आहेत. उधळ कुमार आणि विजय कुमार यांच्याकडून पसरलेल्या अफवेमुळे ही घटना घडली, ते जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. आम्ही प्रशासनाला सर्व जखमींना सरकारी खर्चाने उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. आमचे मंत्री आणि जिल्हाधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत.