Khed News Pudhari
पुणे

Khed News: १० लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद यांच्या तक्रारीनंतर खेड पोलिसात गुन्हा दाखल

जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद यांची खेड पोलिसांत तक्रार; जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: जैदवाडी , ता.खेडच्या सरपंच व त्यांच्या कुटुंबियांचे खोटे व्हिडिओ, सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत बदनामी केली . तसेच हे व्हिडिओ काढून टाकण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

आनंदराजे इंदुमती पाटील , रा. पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव असे तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून जैदवाडीच्या सरपंच शितल विकास जैद यांनी या प्रकरणी खेड पोलिसात तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, पती विकास कचरू जैद हॉटेल व्यवसाय करतात तर सौ जैद सन २०१५ पासून ग्रामपंचायत जैदवाडीच्या सरपंचपदी कार्यरत आहेत.

तक्रारीत म्हटले आहे की, आनंदराजे पाटील यांनी दिनांक १८ जून २०२६ पासून वेळोवेळी सरपंच यांच्या विरोधात खोटे व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करून गावचे ग्रुप आणि पती विकास जैद यांना पाठवले.

तसेच गावविकासातील शासकीय कामात सोशल मीडियाद्वारे अडथळे निर्माण केले. मात्र सुरुवातीला त्यांनी व कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केले.

पुढे दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.५७ वाजता आनंदराजे इंदुमती पाटील यांनी विकास जैद यांच्या मोबाइलवर व्हॉईस मेसेज पाठवून “तुम्ही मला दहा लाख रुपये द्या. मी तुमच्या व्हायरल केलेल्या सर्व पोस्ट डिलीट करेन.

नाहीतर आणखी पोस्ट व्हायरल करून बदनामी करेन” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५४ वाजता पुन्हा व्हॉईस मेसेज पाठवून “माझ्याकडे हत्यार आहे, मी तुला जीवे मारीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच वारंवार सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सरपंच शितल जैद यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा गुरुवारी (दि १५) दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT