दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश करतेवेळी (छाया- दीपक देशमुख) Pudhari Photo
पुणे

Wari 2025 | जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंडकरांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत

पुढारी वृत्तसेवा

नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥

व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥

न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥

यवत : जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज (सोमवारी) दौंड तालुक्यात बोरीभडक चंदनवाडी या गावात तालुक्याच्या सीमेवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. हरिनामाचा गजर करत, भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने पालखी सोहळा पुढे यवत मुक्कामी रवाना झाला.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, नितीन दोरगे, आप्पासाहेब पवार, कांचन कूल, सरपंच कविता कोळपे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस , पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , नारायण देशमुख, तहसीलदार अरुण शेलार, तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी महेश डोके आदी मान्यवर उपस्थित होते.

उरुळी कांचन येथे दुपारची न्याहारी घेतल्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी पालखी रथावर पुष्पवृष्टी केली. आमदार राहुल कूल यांनी पालखीने तालुक्यात प्रवेश केल्यानंतर काही अंतर पालखीचे सारथ्य केले. दरम्यान पालखी मार्गावर भैरवनाथ विद्यालय खुटबाव यांच्या वतीने आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

यानंतर पालखीने जावजीबुवा वाडीत विश्रांती घेतली. सहजपूर फाटा आणि कासुर्डी फाटा येथे पालखीचे शिस्तबद्ध स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी भाविकांनी उभ्या रांगा लावून, पुष्पवृष्टी करत आणि भजनी मंडळांच्या कीर्तन गोष्टीसह वातावरण भक्तिमय केले.

पालखीच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण १७१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान मागील महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पालखी मार्गच्या कडेला हिरवळ जाणवत होती त्यामुळे वारी मधील वारकऱ्यांना चालताना थकवा जाणवत नव्हता दौंड तालुक्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करत वारकऱ्यांच्या अल्पोपहार ची सोय केली होती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT