पुणे: ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा’चा अखंड जयघोष, पावसाच्या सरी अन् भाविकांमध्ये संचारलेला उत्साह, अशा भक्तिपूर्ण वातावरणात पुण्यात श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा रविवारी (दि. 29) जल्लोषात साजरा झाला.
ओडिशा मधील जगन्नाथपुरीमधील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणेतर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले अन् पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले. (Latest Pune News)
इस्कॉनतर्फे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयातून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला सुरुवात झाली. इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घेता आले. इस्कॉन संस्थेचे लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. या वेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्कप्रमुख प्रसाद कारखानीस हेही कार्यक्रमात सहभागी झाले होते. केरळमधील थैयम लोककला आणि संस्कृतीवर आधारित महाविष्णू, नृसिंह सरस्वती आदी देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्यरथ हे यात्रेतील आकर्षण होते.
रथयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या गालिच्यावर रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता. रथयात्रा मार्गावर भगवद्गीता आणि भागवतावर आधारित पुस्तकांचे आणि प्रसादाचे वितरण चालू होते. सायंकाळी आरती, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी होती.
फुलांसह रंगबिरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. समारोपानंतर भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. 20 हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर झाले, तर रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.
हिंदू समाजापर्यंत गीता पोहचावी
आपण हिंदू म्हणून सगळ्याच देवीदेवतांचे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे, हे परमकर्तव्य आहे. एकीकडे वारी सुरू आहे. तसेच इथे रथयात्रा आयोजित केलेली आहे. आज याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये मोठी ताकद आहे. भगवद्गीतेचे महत्त्व पोहचविण्याचे काम इस्कॉन करीत आहे. हिंदू धर्म आपल्या प्रत्येकाला विचाराने मोठे करतो. ही धर्माची विशालता आहे. हिंदू समाजापर्यंत अधिकाधिक प्रमाणात गीता पोहचावी, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.