पुणे

आता तर चक्क धर्मादाय आयुक्तांचीच दिशाभूल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये सावळागोंधळ सुरू असताना वरिष्ठ विश्वस्तांची नावे वगळून चक्क स्वतःच्या मुलाचे नाव बदल अर्जात टाकले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, धर्मादाय आयुक्तांचीच दिशाभूल करणारा आहे, असा दावा या प्रकरणातील हरकतदार प्रवीणकुमार राऊत यांनी केला आहे.

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ही महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू आणि न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य गोपाळकृष्ण गोखले यांनी जून 1905 मध्ये स्थापन केलेली सार्वजनिक संस्था आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील स्वतंत्रतासेनानी तसेच सामाजिक नेते आजीवन सदस्य म्हणून विश्वस्त झाले. देशातील विविध राज्यांत संविधानानुसार काम सुरू होते. मात्र, 1990 मध्ये मिलिंद देशमुख यांनी आजीवन सदस्य झाल्यापासून स्वतःच्या कुटुंबाला संस्थेच्या मालमत्तेचा लाभ करून घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील विश्वस्त असलेल्यांना अंधारात ठेवून काही ठराव परस्पर संमत करून घेतले.

मराठी येत नसल्याचा घेतला गैरफायदा
संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांनी मराठी भाषा परराज्यांतील सभासदांना येत नाही, हेच हेरून याचा गैरफायदा घेतला. असे काही व्यवहार केले, ज्यामध्ये मेहुणा सागर काळे यांना सोबत घेऊन सोळा एकर जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला. आत्मानंद मिश्रा यांच्या खोट्या सह्या करून मिलिंद देशमुख यांनी महसूल विभागाची फसवणूक केली. त्यांच्याविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल झाले. मात्र, अजून कारवाईचा पत्ता नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

या घटना गंभीर आहेत…
नागपूरमधील मालमत्तेची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा नागपूर शाखेचे आजीवन सदस्य रमेशचंद्र नेवे यांनी विरोध केला. त्या वेळी त्यांचे मानधन रोखले गेले आणि नेवे यांच्या निधनानंतर लगेच मिलिंद देशमुख यांनी चिन्मय देशमुख याला आजीवन सदस्य करण्यास अध्यक्ष दामोदर साहू यांना प्रलोभन देऊन उत्तराखंडमध्ये बैठक घेऊन कोरम नसताना ठराव पास केला. संविधानाच्या विरोधी ठराव असल्याने आत्मानंद मिश्रा यांनी धर्मादायमध्ये प्रकरण दाखल केले, त्याचा निकाल आला नाही. या वेळी आत्मानंद मिश्रा यांना समर्थन देणाऱ्या सभासदांना वगळून अध्यक्ष दामोदर साहू हे मिलिंद देशमुखांना आर्थिक मदत तसेच कार्यालयीन कामानिमित्त ठराव पास करून देतात, असाही दावा राऊत यांनी केला.

सदस्य नसताना मुलाचे नाव…
गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची बेकायदेशीर निवड केल्याचे प्रकरणसुद्धा पुढे आले. या सर्व घटनांचा अभ्यास करून नेवे यांच्या शिफारशीने सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये प्रवीणकुमार राऊत हे आजीवन सदस्य झाले. त्यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या सर्व प्रकरणांचे पुरावे घेऊन धर्मादाय आयुक्तांकडे काही दस्तऐवजांसाठी विनंती केली. तेव्हा त्यात मिलिंद देशमुख यांनी काही वरिष्ठ सदस्यांची नावे बदल अर्जात दाखल केली नाही. मात्र, स्वतःच्या मुलांना सदस्य नसताना बदल अर्ज करून धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले.

… ही तर संविधानाची पायमल्ली
या सर्व घटना मुख्यालय पुण्यात असल्याने देशमुख यांना कुणीही हरकत घेऊ शकत नाही. इतर सदस्यांना मराठी भाषा आणि इथल्या प्रशासनाची माहिती नाही. याचा गैरफायदा घेत महाराष्ट्रात कुणी सदस्य होऊ नये, म्हणून देशमुख हे मला विरोध करीत असल्यचा दावा प्रवीणकुमार राऊत यांनी केला आहे. ही बाब अध्यक्ष दामोदर साहू यांच्या लक्षात आणून दिली. मात्र, खुद्द दामोदर साहू त्यांच्या मुलाला संस्थेत दाखल करून संस्थेचा पैसा घरातच वापरत आहेत. अ‍ॅड. रश्मी सावंत ही देशमुख यांची बहीण संस्थेची कायदेशीर सल्लागार आहे. संस्थेच्या हितापेक्षा संस्था घरची झाली पाहिजे. लाभ कुटुंबातच झाला पाहिजे. ही त्यांची भावना संस्थेच्या संविधानाच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे.

मी न्यायालयात जाण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे दस्तऐवज मागणी अर्ज केला. त्यात वरिष्ठ सदस्यांचे बदल अर्जात नाव दिसले नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख अन् अध्यक्ष दामोदर साहू करीत आहेत, असेच या सर्व कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. यावर लक्ष केंद्रित करून संस्था अबाधित राहावी म्हणून जनतेला तसेच सरकारला आवाहन करीत मी लढा उभारला आहे.
                                                                   – प्रवीणकुमार राऊत, हरकतदार

SCROLL FOR NEXT