'महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम सर्वांचेच' Pudhari
पुणे

Political News: 'महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम सर्वांचेच'

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांचे मत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटनांमुळे काही गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. राज्यात एकी निर्माण झाली पाहिजे. या ठिकाणी येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नसून ती जबाबदारी सर्वांची आहे. त्याकरिता साहित्यिकांची लेखणी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

सरहद, पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे होणार्‍या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मसापचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात एकी निर्माण करणे ही जबाबदारी सर्वांची आहे. हा विचार शेवटच्या माणसापर्यंत जाईल तेव्हाच एकी निर्माण होईल. राजकीय विचार वेगळे असतील, पण महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. सर्वांनीच राज्यात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. काही दिवसांपासून राज्यात अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे.

राज्यात आजवर आलेल्या संकटांवर मात करण्याची ताकद मराठी माणसात आहे. किल्लारीचा भूकंप, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या निर्णयावेळी जाती-धर्मांत द्वेष पसरला होता. या संकटाच्या काळात मराठी माणसे एकत्र आल्याचे सर्वांनी पाहिले आहे. दिल्लीत होणार्‍या साहित्य संमेलनाने मराठी भाषेचा गौरव होणार आहे. दिल्लीतील लोकांना मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे. या संमेलनाबद्दल सर्वांना आतुरता आहे.

कसबे म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वारशाची जपणूक करणारे नेते म्हणजे शरद पवार होय. पवार यांच्याभोवती नेहमीच साहित्यिकांचा गोतावळा असतो. सर्वसमावेशक अशा राष्ट्रवादाचे पवार समर्थक असून, असा राष्ट्रवाद नेहमीच समाजाबरोबर उभा राहतो. याप्रसंगी डॉ. मिलिंद जोशी, सदानंद मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नहार यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी, तर आभार डॉ. वंदना चव्हाण यांनी मानले.

बोट धरल्याचा साहित्यात तरी उपयोग

दिल्ली येथे होणार्‍या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असून, त्यानंतर उद्घाटनाचा पाहुणा ठरला आहे. उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. राजकारण बोटाला धरून प्रवेश केलेल्या मोदींचा राजकारणात नाही, तर साहित्य क्षेत्रात उपयोग होईल, अशी अपेक्षा असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT