राजेंद्र खोमणे
नानगाव : शिक्षक म्हणून नोकरी लागल्यापासून ते पन्नाशीच्या पुढे येईपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. जेव्हा तरुण व कुटुंबाची जबाबदारी नव्हती तेव्हा ज्या ठिकाणी बदली झाली तेथे काम केले. मात्र, सध्या पन्नाशी ओलांडल्यावरदेखील अतिदुर्गम भागात बदल्या होत आहेत. त्यामुळे पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षक दाम्पत्यांना आता शासनाच्या या बदलीच्या धोरणाचा फटका बसणार आहे. परिणामी, अनेक शिक्षक व शिक्षिका संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
सन 2022 या शैक्षणिक वर्षातील शिक्षकांच्या बदल्या तब्बल एक वर्ष विलंबाने म्हणजे 2023 च्या शैक्षणिक वर्षात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कित्येक शिक्षकांवर या वयात आपला तालुका सोडून दुसर्या तालुक्यात अतिदुर्गम भागातील शाळेत काम करण्याची वेळ आली आहे. यामध्ये महिला शिक्षक तसेच कित्येक शिक्षक हे जिल्हा परिषद शिक्षक पती-पत्नी असूनही एकत्रीकरणाचा कोणताही विचार न करता या वयात कौटुंबिक विस्कळीतपणास कारण ठरत आहेत.
या वयादरम्यान व्यक्तींना विविध शारीरिक आजार, आई-वडिलांची सेवा, कौटुंबिक जबाबदार्या, अशी विविध कर्तव्ये असतात. त्यामुळे अशा बदली प्रक्रियेमधून या शिक्षकांना वगळणे गरजेचे आहे. मात्र, असा कोणताही विचार न करता पन्नाशीच्या पुढील शिक्षकांच्या देखील बदल्या झाल्याचे बोलले जात आहे.
स्त्रियांच्या सुरक्षिततेचा विचार नाही
स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनोळखी अतिदुर्गम ठिकाणी नेमणूक देताना त्यांना प्राधान्याने आपली सुरुवातीच्या काळातील सेवा अतिशय दुर्गम भागात केली असूनही तत्कालीन परिस्थितीचा विचार न करता सद्य:स्थितीतील मोघम निरीक्षण करून बदल्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. संबंधित शाळा सुगम किंवा दुर्गम घोषित करण्यात आल्या आहेत, या बाबीचाही फटका बदली धोरण राबविताना या शिक्षकांना बसला आहे.
प्रथमच राबविला सहावा टप्पा
बदली धोरणाच्या सहाव्या टप्प्याबद्दल माहिती होती. मात्र, हा टप्पा कसा राबविण्यात येणार, याची माहिती नव्हती. याआधी कधीच बदली धोरणात सहावा टप्पा नव्हता. मात्र, अशा प्रकारे हे बदली धोरण लागू केल्यामुळे अनेक शिक्षक आणि शिक्षिका या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.