झेंडूच्या फुलांना मागणी Pudhari
पुणे

झेंडूला आला बहर, पण बाजारभावाने केला कहर

पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सव, दसर्‍याला फुलांच्या हार, माळा आणि सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मागणी वाढते. शेतकर्‍यांच्या कष्टाला अर्थप्राप्ती होते. मुबलक पाऊस झाल्याने खेड तालुक्यात फूलशेती बहरल्याचे पाहायला मिळत असून, या फुलांना मागणी व भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे फूल उत्पादक शेतकर्‍यांसाठी दसरा आणि दिवाळी काही प्रमाणात कडवट होणार आहे. खेड तालुक्यात गतवर्षी झेंडूचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी, मागणी वाढून चांगलाच भाव मिळाला होता. यावर्षी मात्र उत्पादन अधिक झाल्याने भाव गडगडले आहेत. गेल्या वर्षी झेंडूच्या फुलांची प्रतिकिलो 70 ते 100 रुपयांपर्यंत विक्री होत होती. यावर्षी हे भाव 35 ते 40 रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. फुलांना भाव नसल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

नवरात्रोत्सव व दसरा या सणाला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडूचे मळे बहरली आहेत. नवरात्रोत्सव व दसरा, दिवाळी तोंडावर आली असताना फुलांचे भाव वाढण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. दसर्‍याला घराघरांत झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पूजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. परंतु या वर्षी झेंडूच्या फुलांनी निराशा केली असून, उत्पादन खूप झाल्याने झेंडूचे दर चांगलेच कोसळले आहेत. त्यामुळे झेंडूला भाव मिळत नसल्याचे शेतकरी शिवाजी मांजरे, अरविंद मांजरे यांनी सांगितले. दिवाळीत चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT