पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : ज्वारी व गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत. बाजारपेठेत ज्वारीचे दर सध्या किलोमागे 10 ते 12 रुपयांनी तर गव्हाचे दर 3 ते 5 रुपयांनी महागल्याने सर्वसामान्यांना जेवणेही महाग झाले आहे. परतीच्या पावसाने जास्त दिवस मुक्काम ठोकल्याने याचा फटका ज्वारीलाही बसला आहे. रब्बीच्या पेरण्याही कमी प्रमाणात झाल्या आहेत.
बहुतांश ठिकाणी वापसा न आल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. त्यातही उशिराने होणार्या पेरणीत शेतकर्यांनी गव्हालाच पसंती दिली आहे. तीन महिन्यापूर्वी 31-32 रुपये दर असणारी ज्वारी आता 45 ते 50 रुपयांपर्यंत गेली आहे. गव्हाचा दरही वाढून 30 ते 35 रुपयांवर गेला आहे. परिणामी सध्या गहू व ज्वारी यांची खरेदी ग्राहक गरजेपुरतीच करीत आहे. नवीन ज्वारी, गहू बाजारात येण्यासारखी आणखी तीन-चार महिन्याचा कालावधी असल्याने तोपर्यंत त्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्पादक पट्ट्यात पेरणीचे प्रमाण घटले
गावरान ज्वारी बार्शी, जामखेड, करमाळा या भागातून येते. परंतु परतीचा पाऊस उशिरापर्यंत झाल्याने या भागातही पेरण्या उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे नवीन ज्वारी, गहू बाजारात येण्यास उशीर होणार आहे. परिणामी ज्वारी आणि गव्हाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणेच अवघड झाले आहे.