पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊनही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय फ्लेक्स आणि नामफलक झळकत आहेत. त्यामुळे आजपासून (मंगळवार) कारवाई हाती घेण्यात येणार असून, त्यानंतर फ्लेक्स लावल्यावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे निवडणूक आयोगाने 18 जानेवारी रोजी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
या निवडणुकीसाठी त्या दिवसापासून मतदारसंघात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय पक्षांचे व व्यक्तींचे फलक, राजकीय चिन्हांचे फलक झाकणे तसेच राजकीय व्यक्तींच्या फ्लेक्सबाजीवर बंधन येणे अपेक्षित होते. मात्र, संपूर्ण मतदारसंघात या सर्व गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत, जागोजागी राजकीय फ्लेक्स आणि नामफलक झळकत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून आजपासून नामफलक झाकण्याचे व फ्लेक्स काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारवाईनंतर कोणी फ्लेक्स किंवा नामफलक लावल्यास त्यांच्यावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.