पुणे : पुण्यात नुकताच झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वार्याच्या तडाख्यात सर्वाधिक विदेशी प्रजातींची झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. या वृक्षांमुळे चार दिवसांत दोन निष्पाप पुणेकरांचा बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुर्घटनांमुळे जाग आलेल्या पुणे महानगरपालिकेने रस्त्यांच्या कडेला स्थानिक आणि मजबूत स्वदेशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्याकडेला लावलेली अन् पावसात पडलेली झाडे ही विदेशी होती. यात गुलमोहर, विलायती चिंच, पेल्टोफोरम आणि रेट्री यांसारख्या विदेशी प्रजातींची झाडे होती. विदेशी झाडे मुळातच कमकुवत, ठिसूळ आणि त्यांचे आयुर्मान कमी असते. त्यामुळे पावसातील वादळी वार्यात अशी झाडे पडलीत. याउलट वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा आणि बहावा यांसारखी स्वदेशी झाडे अधिक मजबूत असून, ती नैसर्गिक आपत्त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम असतात.
नुकत्याच झालेल्या पावसांमध्ये स्वदेशी झाडांपेक्षा विदेशी झाडेच सर्वधिक पडली आहेत. कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वार राहुल श्रीकांत जोशी (वय 49, रा. कर्वेनगर, एसबीआय बँकेसमोर) मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. तर बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे झाड कोसळल्याने रिक्षाने प्रवास करणार्या 76 वर्षीय ज्येष्ठ महिला शुभदा यशवंत सप्रे (वय 76, रा. सिंहगड रोड) यांचा झाड अंगावर पडून मृत्यू झाला. रिक्षाचालक संजय अवचरे हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जाग आलेल्या उद्यान विभागाने रस्त्याशेजारी स्वदेशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.
घोरपडे म्हणाले की, स्थानिक झाडे आपल्या पर्यावरणासाठी अधिक उपयुक्त आहेत. ती केवळ मजबूत नसतात, तर पक्ष्यांसाठी आणि इतर जीवसृष्टीसाठीही फायदेशीर ठरतात. नागरिकांनी आपल्या परिसरात स्थानिक झाडे लावून पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावावा.
शहरात 70 ते 80 वर्षांपूर्वी रस्त्यांच्या कडेला अनेक विदेशी झाडे लावण्यात आली होती. मात्र, आता आम्ही रस्त्यांच्या कडेला स्वदेशी झाडे लावण्यास सुरुवात केली आहे, असे उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.
पुण्यात नुकत्याच झालेल्या पावसात दि. 23 तारखेला 6 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या, तर दि. 25 आणि 26 मे 2025 रोजी एकूण 17 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. यामुळे काही घटनांमध्ये जीवितहानी आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसले, तर फक्त 26 तारखेलाच एकूण सहा झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद पुणे अग्निशमन दलाने केली आहे.