पुणे

हवेली तालुक्यातील समस्यांना कोणी वाली आहे का?

अमृता चौगुले

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या हवेली तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याशी संबंधित प्रश्नच सुटलेत की काय? असा प्रश्न हवेली तालुक्यातील जनतेला पडला आहे. हवेली तालुक्यातील प्रश्न सोडविण्यात तालुक्यातील सत्ताधारी व विरोधक सुतराम लक्ष देण्यात स्वारस्य दाखवीत नसल्याने आधीच नेतृत्वाने पोरक्या असलेल्या तालुक्याचे प्रश्न सुटावेत म्हणून नागरिकांवर इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधींची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

शिरूर-हवेली मतदारसंघात झपाट्याने शहरीकरण होत असलेला हवेली तालुका दिवसेंदिवस समस्यांनी वेढला जाऊ लागला आहे. तालुक्यात रहिवासी प्रश्नासह सहकार क्षेत्र, रेल्वे व बस वाहतूक सुविधा, अपूर्ण रस्ते, वीज, पोलिस प्रशासन सुसूत्रता, मिळकतींवर आरक्षणे आदी प्रश्नांनी त्रस्त करून ठेवले आहे. तालुक्यात नागरिकांशी निगडित प्रश्नांची संख्या मोठी असताना तालुक्याचे प्रश्न सोडविण्यात नेतृत्वाचा अभाव स्पष्ट जाणवत आहे. तर नेतेमंडळी मात्र सत्तासंघर्षात आपले अस्तित्व काय, या प्रश्नाचे उत्तर शोधत बसली आहे.

पूर्व हवेली तालुक्यातील 38 गावे शिरूर मतदारसंघात एकसंध जोडली आहेत. तालुका नगर रस्ता व सोलापूर रस्ता या दोन भागांत विभागला आहे. तालुक्यातील वाघोली हे गाव महापालिकेत समाविष्ट झाले आहे, तर कदमवाकवस्ती हद्दीपर्यंत मनपा येऊन ठेपली आहे. अशा वेळी तालुक्यातील इतर गावांत नागरीकरणाचा बोजा वाढू लागला आहे. मात्र या नागरी समस्या सोडविण्यात सत्ताधारी व विरोधक स्वारस्यच दाखवित नसल्याने "मनी नाही भाव देवा मला पाव" अशी अवस्था नागरिकांची होऊन बसली आहे.

हवेली तालुक्यातील नगर व सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न, तालुक्यातील लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्यात नागरिक व पोलिसांत निर्माण झालेला बेबनाव, कायद्याच्या आडून वाढलेला अतिरेक, पीएमआरडीएने आरक्षित केलेली मिळकतींवर आरक्षणे, आरक्षणे जाहीर करून न झालेली अंमलबजावणी, गावठाण रहिवासी क्षेत्राची वाढ, रिंग रोड व रेल्वेसाठी भूसंपादन, रेल्वेचे प्रवासी प्रश्न, पाच वर्षाहून अधिक काळ रस्त्यांची रखडलेली कामे आदी प्रश्न सोडविण्यात स्वारस्यच दाखविले जात नसल्याने 'तालुक्याचे नाव मोठे पण लक्षण खोटे' अशी अवस्था होऊन बसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT