पुणे : महाराष्ट्रात पाच वर्षांत एकही बडा उद्योग आलेला नाही. सरकार लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे देत आसलेले आकडे खोटे आहेत. मोठे उद्योगच राज्यात आले नाहीश्र, तर छोटे उद्योग येणार कसे? असा सवाल उपस्थित करत उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी सरकारी धोरणावर टीका केली.
सहकारनगर येथील मुक्तांगणच्या खुल्या सभागृहात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत ते बोलत होते. जयश्री अरुण फिरोदिया, अतुलकुमार उपाध्ये, प्रवीण शिरसे, माजी नगरसेवक गोपळ चिंतल, अलका पटवर्धन या वेळी उपस्थित होत्या. फिरोदिया म्हणाले, विविध कारणांमुळे राज्यातील उद्योग बंद पडण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे. अनेक उद्योग व्हिएतनामला जात आहेत. कारण काय तर इथे जागा मिळायला सहा महिने लागतात. इतर परवानगी घेऊन उद्योग सुरू करायला दोन वर्षे, मग उद्योग का येतील. गुजरात आणि चेन्नईला का पसंती मिळते, याचा विचार केला पाहिजे. पिंपरी-चिंचवडमध्ये टाटा आले म्हणून इतर छोटे उद्योग सुरू झाले. त्यामुळे मोठ्या उद्योगांना आकर्षित केले पाहिजे.
राज्यात गेल्या पाच वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही. मग छोटे उद्योग कसे निर्माण होतील. आपण छोट्या उद्योगांना मोठं आणि मोठ्या उद्योगांना आणखी मोठं केलं पाहिजे. कोरियाने सॅमसंग, देवू सारख्या कंपन्यांना दहा वर्षे सवलत दिली. त्यांना मोठ करत स्वयंपूर्ण केले. तसं आपण का करत नाही ? आज उद्योगांना 12 रुपये युनियटने वीज मिळते, 10 ते 12 टक्के वार्षिक व्याजाने कर्ज घ्यावे लागते. चीनमध्ये अगदी याच्या उलट आहे. वीजशुल्क आणि कर्जदर अत्यल्प आहेत. मग, त्यांच्याशी आपण स्पर्धा कशी करणार, असा सवाल फिरोदिया यांनी उपस्थित केला.
आज मध्यमवर्गालाही शिक्षण आणि आरोग्याचा खर्च परवडत नाही. मला अनेक कामगार म्हणतात पगारवाढ देऊ नका फक्त तुमच्या शाळेत मुलाला प्रवेश द्या. चांगल्या रुग्णालयात हॉस्पिटलचा उपचार होईल ते पाहा. नागरिकांचा आरोग्य आणि शिक्षणावर होणारा खर्च मोठा आहे. डॉक्टर बनण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. मग, सरकार गरिबांसाठी काही केले असे कसे म्हणते ? शिक्षण-आरोग्य स्वस्तच हवे. त्यामुळे सरकारने खोटं भासवणे बंद करावे, असे आवाहन उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले.