पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेला ब्लूमबर्ग फिलॅनत्रॉफीज अॅण्ड ग्लोबल डिजाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (जीडीसीआय) यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहराला ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर (बीआयसीआय) हा ग्लोबल चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातील 275 शहरांमधून दहा शहरांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. त्यात भारतातून पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे. पुरस्कारासोबत 3 कोटी 2 लाखांचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
जागतिक सायकल दिनाच्या पूर्वसंध्येला हा निकाल जाहीर झाला आहे. पालिकेने शहरात निर्माण केलेल्या 80 किलोमीटर अंतराचा सायकल ट्रॅक तयार केला आहे. तसेच, सायकल वापरण्यासाठी विविध उपक्रमांमुळे आयोजन केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळालेले पिंपरी-चिंचवड हे देशातील एकमेव शहर असल्याने ती बाब शहरवासीयांसाठी गौरवास्पद आहे. त्याबद्दल आयुक्त सिंह यांनी स्थापत्य प्रकल्प विभागप्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, बायसिकल मेयर ऑफ पिंपरी चिंचवड, आयटीडीपी इंडिया, आर्किटेक्ट व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले.
पालिकेच्या वतीने शहरातील विविध 5 मार्गांवर सायकल ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत. सायकल चालविण्यासाठी नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. हरित सेतूअंतर्गत सायकल ट्रॅक व पदपथ निर्माण करून ते उद्यानांना जोडण्यात येणार आहेत. विविध उपक्रमांचे आयोजन करून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. दरम्यान, या पूर्वी पालिकेस केंद्र सरकारकडून सायकल फॉर चॅलेंज उपक्रमासाठी 1 कोटीचे बक्षीस मिळाले आहे.