संतोष ननवरे
शेळगाव (पुणे): इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी आलेल्या साहित्यापैकी काही साहित्य लंपास झाल्याची चर्चा सध्या शेळगाव परिसरात सुरू आहे. या घटनेची चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याची लेखी मागणीदेखील ग्रामस्थांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वांत मोठे व सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णाच्या सेवेसाठी शेळगाव येथे सुरू झाले. आजपर्यंत महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग व अन्य काही सामाजिक संस्थेकडून लाखो रुपयांच्या निधीतून संगणक, एसीसह अन्य विविध साहित्य रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी आले. मात्र, प्रत्यक्षात काही साहित्य आरोग्य केंद्रातून लंपास झाले, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत आलेल्या साहित्यांची व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या साहित्यांची लेखी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ई-मेलमार्फत केली आहे.
यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना इंदापूर तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत, असे इंदापूरचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले आहे.
वरिष्ठांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा लेखी आदेश देताच आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कर्मचार्यांपैकी दोन कर्मचार्यांनी दोन संगणक हे शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणून ठेवले. ते कुठून व कुणाच्या सांगण्यावरून पुन्हा आरोग्य केंद्रांत आणले, याचीदेखील चौकशी त्या दोन कंत्राटी कामगारांकडून करून दोषी आढळल्यास कारवाई करून त्यांना कामावरून कमी करावे, अशीदेखील मागणी ग्रामस्थांनी केली आहे.