पिंपरी : कमी खर्चात डांबर व काँक्रीटच्या दर्जेदार रस्त्याची निर्मिती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुरत शहराच्या दौर्यावर गेले होते. ते प्रकल्प शहरात राबविण्यात येणार आहेत.
या दौर्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, ड्रेनेज विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, स्मार्ट सिटी व उद्यान विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया या चार अधिकार्यांचा समावेश होता.
सुरत शहरात कमी खर्चात डांबरी व काँक्रीट अशा मिश्रणातून अधिक दर्जेदार रस्ते बनविले जात आहेत. त्या रस्ते कामाची प्रत्यक्ष पाहणी अधिकार्यांनी केली. हे रस्ते पाच वर्षे टिकतात. त्याचा खर्च तुलनेत कमी आहे. त्याचा दर्जाही अधिक उत्तम आहे. तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. त्या प्रकल्पास अधिकार्यांनी भेट दिली. प्रक्रिया केलेले पाणी विकले जाते. ते पाणी पिण्यायोग्य असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
'ते' प्रकल्प शहरात राबविणार
सुरत शहरात राबविण्यात आलेला डांबर व काँक्रीट मिश्रणातून रस्ते निर्मिती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. तो प्रयोग यशस्वी ठरल्यास तो संपूर्ण शहरात राबविला जाणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांची ही नवीन संकल्पना आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.