पारगाव; पुढारी वृत्तसेवा : इतिहास संशोधक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी रांजणी (ता. आंबेगाव) तील ग्रामदैवत श्रीनरसिंह मूर्ती, महादेव मंदिर, नदीघाट व कोरीव दगडी शिल्पांची पाहणी करून ग्रामस्थांकडून माहिती शनिवारी (दि.10) घेतली. रांजणीत ग्रामदैवत नरसिंह मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिरातील प्राचीन नरसिंह मूर्तीची पाहणी प्रा. घाणेकर यांनी केली. तसेच गावात श्रीनरसिंह महाराज कसे आले? नरसिंह भक्त लखोजी महाराज यांची अख्यायिका ग्रामस्थांकडून ऐकून घेतली.
महादेव मंदिर, जुनी दगडी शिल्पे, विरगळ यांची पहाणीही केली. रांजणीला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ग्रामदैवत श्रीनरसिंह मंदिराचे बांधकाम नाना फडणवीसांनी पूर्ण केले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढाइर्च्या काळात रांजणीत दोन दिवस आश्रय घेतला होता. गावातील ऐतिहासिक गोष्टी व घटनांची माहिती खंडू भोर, गोविंद वाघ, शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात, अशोक भोर यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती महादू भोर, सरपंच भगवान वाघ यांच्या हस्ते घाणेकर यांचा सत्कार झाला.