पुणे

पिंपरी : एनआयव्हीकडेच एच 3 एन 2 ची तपासणी

अमृता चौगुले

पिंपरी : एच 3, एन 2 आजारासाठी घेण्यात येणार्‍या स्वॅबची (घशातला द्रव) तपासणी करण्याची सोय तूर्तास राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडेच (एनआयव्ही) उपलब्ध आहे. महापालिकेकडे त्याच्या चाचण्या करण्याची सोय नाही. तसेच, या आजाराची चाचणी होऊन त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी साधारण 24 ते 48 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे शहरात या आजाराचे रुग्ण वाढल्यास महापालिकेला एनआयव्हीकडून येणार्‍या अहवालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेने कोरोना काळात कोरोनाच्या चाचण्या करण्याची सोय महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन दिली होती. सध्या एन्फ्लुएन्झा ए-एच 3 एन 2 या विषाणूचे 4 रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यापैकी एका वृद्धाचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे या आजाराविषयी चिंता वाढली आहे. सध्या शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, ताप या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एच 3 एन 2 या आजारातही प्रामुख्याने हीच लक्षणे आढळत असल्याने याबाबत दक्षता घेण्याची गरज वाढली आहे.
महापालिकेने कीट मागविलेले नाही

एच 3, एन 2 आजारासाठी घेण्यात येणार्‍या स्वॅबची (घशातला द्रव) तपासणी करण्याची सोय सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडेच (एनआयव्ही) उपलब्ध आहे. महापालिकेने या आजाराची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेले कीट मागविलेले नाही. या कीटच्या माध्यमातून एका वेळी 100 रुग्णांची तपासणी करावी लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एच 3, एन 2 आजारासाठी सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडेच (एनआयव्ही) तपासणी करण्याची सोय उपलब्ध आहे. एच 3, एन 2 वर सध्या लस जरी उपलब्ध नसली तरी एन्फ्लुएंझावर लस उपलब्ध आहे. इन्फ्लुएंझाचाच हा प्रकार आहे. तसेच, उपचारासाठी टॅमिफ्ल्यू गोळ्या देखील आहेत.

                                                   – डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी,

SCROLL FOR NEXT