पुणे

पुणे : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेसाठी नवीन साडेपाचशे ठिकाणांची पाहणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुन्ह्यांची उकल, वाहतूक शाखेसाठी, तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी नवीन आवश्यक असणार्‍या साडेपाचशे सीसीटीव्हींच्या स्पॉटची पाहणी पुणे पोलिसांच्या समितीने सुरू केली आहे. शहराच्या बदलत्या स्वरूपात या सीसीटीव्हींची आवश्यकता कशी हवी, आणखी किती सीसीटीव्ही आवश्यक आहेत, तसेच सद्य:स्थितील हे सीसीटीव्ही कसे असावेत व कोणत्या अँगलने असावे, यासाठी ही पाहणी केली जात आहे. वाहतूक शाखा, गुन्हे शाखेच्या स्थानिक पोलिसांकडून ही पाहणी सुरू केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एक समिती स्थापन केली.

समितीने शहरातील परिमंडळ एकमधील महत्त्वाच्या ठिकाणांची व सीसीटीव्हींची पाहणी केली. सद्य:स्थितीतील सीसीटीव्हींची पाहणी करून आवश्यक ते बदल करण्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी मागविला आहे. त्यानुसार समितीने परिमंडळ एकमधील खंडोजीबाबा चौकातील सीसीटीव्हींची पाहणी केली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय मगर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, तसेच वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त, स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या स्क्वॉडचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील स्ट्रीट क्राईमचा वाढता आलेख पाहता पुण्यात इन व आऊट होणार्‍या ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. वाहन चोरी, घरफोड्या, तसेच चेन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगनुसार पोलिसांकडून स्पॉट निवडले जाणार आहेत.

त्यासाठी शहरातील सर्व मॉल, शाळा-महाविद्यालये, तसेच गर्दीचे व महत्त्वाच्या ठिकाणीदेखील पाहणी केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणीकरून सीसीटीव्ही बसविण्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.

शहरातील गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था, तसेच कायदा व सुव्यवस्था अन् व्यवस्थापन या दृष्टीने ही पाहणी केली जात आहे. आवश्यक ठिकाणी तसेच आवश्यक सीसीटीव्हींची संख्या यातून ठरवली जाणार आहे. त्याचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्तांना सादर केला जाणार आहे. हा अहवाल प्रशासनाला सादर करून नवीन सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
                                       – विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

मेट्रो व उड्डाणपुलामुळे सीसीटीव्हींचा फायदाच नाही
शहरात मेट्रोचे व नवीन उड्डाणपुलांचे कामकाज तेजीत सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत असलेल्या काही सीसीटीव्हींतून पोलिसांना आवश्यक माहिती मिळत नसल्याने त्यांचे ठिकाण बदलले जाणार आहे. तसेच, शहरातील सर्वच सीसीटीव्हींचे अँगलही चेक केले जात आहेत. येरवड्यातील गुंजन चौक, तसेच विद्यापीठातील एका ठिकाणचे सीसीटीव्हीत उपयुक्त असे काहीच कैद होत नसल्याने पोलिस यावर लक्ष ठेवून सर्वच सीसीटीव्ही चेक करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT