पुणे: नागपूर येथे वरिष्ठ महिला गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत शहर निवड चाचणीतून निवड झालेल्या आठ खेळाडूंना बाहेर ठेवून अन्य खेळाडूंना संधी दिली जात असल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निर्देशानुसार सुरू असल्याचे स्पष्टीकरण आयोजकांकडून देण्यात आले आहे.
पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर म्हणाले, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे संलग्न अधिकृत जिल्हा व शहर संघटनेच्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त काही खेळाडू अधिकृत संघटनेच्या निवड चाचणीमध्ये सहभागी न होता थेट आले आहेत व अशा खेळाडूंना संधी देण्याने निवड चाचणीमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या खेळाडूंवर अन्याय होणार आहे.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून अधिकृत जिल्हा/शहर संघटनेचे राष्ट्रीय किंवा निदान महाराष्ट्र 3 स्टार पंच आवश्यक आहेत. परंतु, एकही राष्ट्रीय पंच या स्पर्धेमध्ये नाही व जे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पंच स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक होते, त्यांना न घेता केवळ ठरावीक जवळच्या जिल्ह्यांचे व कमी पात्रतेचे पंच या स्पर्धेमध्ये आहेत.
इतकेच नव्हे, तर ज्या पंचांना आम्ही संघटनाविरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबित केले आहे, त्यांपैकी एका पंचास आपण या स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करू देत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
रिंगमध्ये खेळाडूंवर आंदोलनाची नामुष्की
पुण्यातून निवड चाचणीमधून पुण्याच्या संघात गेलेल्या आठ खेळाडूंना राज्य स्पर्धेत थोपवण्यात आले. इतर खेळाडूंना घेण्याचा घाट घातल्याने या खेळाडूंनी बॉक्सिंग रिंगमध्येच आंदोलनाचा पवित्रा घेत निषेध नोंदविला आहे. हे सर्व खेळाडू स्वखर्चाने सहभागी झाले असून, अध्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने दोन संघटनांच्या वादामुळे अॅड हॉक कमिटी नेमण्यात आली होती. या कमिटीच्या निर्णयाप्रमाणे दोन्ही बाजूंच्या खेळाडूंची चाचणी होऊन ते खेळाडू राज्य स्पर्धेत खेळतील.- मनोज पिंगळे, सदस्य, अॅड हॉक कमिटी
पुण्यातून निवड झालेल्या आठ खेळाडूंवर अन्याय होत आहे. याबाबत नेमलेल्या कमिटीचे सदस्य मनोज पिंगळे यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु, तरीही खेळाडूंवर अन्याय होत असेल, तर हे चुकीचे आहे.- अविनाश बागवे, अध्यक्ष, पुणे शहर बॉक्सिंग संघटना