पुणे

कृषी महाविद्यालयात ‘साहिवाल’चे माहिती संकलन केंद्र मंजूर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येथील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाला साहिवाल गायींच्या संवर्धन व संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डगिं युनिट) मंजूर झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिली. नवी दिल्लीतील केंद्राच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तर प्रदेशमधील मेरठ केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फेे हे केंद्र मंजूर करण्यात आले असून, निधीही दिला जाणार आहे.

देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गायींच्या आनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व आनुवंशिक सुधारणा करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. साहिवाल गायींची सरासरी दूध उत्पादनक्षमता 2500 ते 2750 लिटर प्रतिवेत इतकी असून, दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण 4.5 ते 4.75 टक्के इतके आहे. देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी साहिवाल गायींचे संवर्धन करण्यास या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशी गायींच्या दूध उत्पादनवाढीला हातभार लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
देशात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहिवाल गायीचे मोठे हब महाराष्ट्रात तयार होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल, असा विश्वास महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मंजूर झालेले डेटा रेकॉर्डिंग युनिट देशातील चौथे आहे. उर्वरित तीनमध्ये लुधियाना (पंजाब), पंतनगर (उत्तराखंड) व हिसार (हरियाणा) येथे आहेत. नवीन प्रकल्पात शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांच्यासह डॉ. विष्णू नरवडे व डॉ. धीरज कंखरे सहशास्त्रज्ञ म्हणून काम पाहणार आहेत. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT