पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातून परराज्यात उद्योग जाण्यामागील कारणे काय, उद्योग नेमके कशामुळे बाहेर जात आहेत, याची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात येईल. शिंदे-फडणवीस सरकार हे नवीन उद्योगांसाठी 'रेड कार्पेट' देतानाच लघुउद्योग आणि उद्योगांना देखील पाठबळ देणार आहे. लघुउद्योजकांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी येत्या बुधवारी बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीत धोरणात्मक निर्णय वगळता अन्य बहुतांश मागण्या मंजूर करण्यात येतील, असे ठोस आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे दिले.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने शनिवार (दि.. 19) मोशी-संतनगर येथे आयोजित उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड व चाकण औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांना जाणवणार्या प्रमुख समस्यांचा पाढा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी वाचला. संघटनेचे संचालक प्रमोद राणे, हर्षल थोरवे, विजय खळदकर, नवनाथ वायाळ, संजय जगताप, सुरेश म्हेत्रे यांचे संयोजनासाठी सहकार्य मिळाले.
महावितरणने लघुउद्योग किंवा उद्योगांचा वीज पुरवठा खंडित करण्यापुर्वी त्याबाबत उद्योग विभागाच्या अधिकार्यांना पूर्वकल्पना द्यायला हवी. त्याशिवाय, त्यांचा वीज पुरवठा खंडित करु नये. महावितरणकडून जर लघुउद्योगांचा चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत असेल तर उद्योजकांनी काय करायचे. ज्या उद्योजकांची थकबाकी बाकी आहे, त्यांना थकित रक्कम भरण्यासाठी हप्ते ठरवून द्यावे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि तळेगाव परिसरात घेणार आहोत, याचा आराखडा बुधवारच्या बैठकीत सादर करावा, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मुळ इंडोनेशियाच्या असणार्या रायगड येथील सीताराम कंपनीने आम्ही महाराष्ट्रातुन निघून जाणार असल्याचा पवित्रा घेतला होता. गेल्या 18 महिन्यात याबाबत बैठकच झाली नसल्याचा त्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर, नुकतीच कॅबिनेट सब-कमिटीची बैठक घेऊन 25 हजार 368 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, असे उद्योगमंत्र्यांनी नमूद केले.
अनधिकृत भंगार दुकानांवर आठवडाभरात कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा व महापालिका प्रशासनाला दिल्या असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी हायपॉवर कमिटीची बैठक न झाल्याने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेली. एक कोरियन कंपनी स्थानिक लघुउद्योजकांना काम देत नसल्याचा मुद्दा या मेळाव्यात उपस्थित करण्यात आला. याबाबत कंपनी समवेत नक्कीच बैठक घेण्यात येईल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विचार काँग्रेसकडून पायदळी तुडविला जात आहे. खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध केला आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याशी असहमत आहोत, असे सांगून काही जण राजकीय पोळी भाजून घेत आहेत. या वक्तव्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची भूमिका काय? असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नेमके काय वक्तव्य केले ते मी ऐकलेले नाही. त्यामुळे त्याबाबत बोलणे योग्य ठरणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.