पुणे

रामभरोसे! कात्रज येथील पेशवे तलावाच्या सुरक्षेबाबत महापालिकेची अनास्था

अमृता चौगुले

रवी कोपनर
कात्रज : पुणे शहरातील नव्याने पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाच्या स्वच्छता, बंद प्रकल्प व सुरक्षेबाबत उद्यान विभागाची अनास्था लपून राहिलेली नाही. त्यातच गेल्या आठवड्यात बुडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने तलावाची सुरक्षाव्यवस्था हा मुद्दा चर्चेला आला असून, स्थानिकांसह पर्यटकवर्गातून प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

अंदाजे 25 एकर क्षेत्रावरील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कात्रजच्या वरच्या तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभीकरण करण्यात आले. कृत्रिम बेटावर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, म्युझिकल फाउंटन, पाटीलवाडा ग्रंथालय व अभ्यासिका, पर्यावरणरहित जॉगिंग ट्रॅक व प्रवेशद्वारावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आले. मात्र, देखभाल व दुरुस्तीच्या निधीअभावी दुरवस्था झाली असून, बहुतांश प्रकल्प बंद आहेत.

तलावावर सुरक्षेसाठी पाच सुरक्षारक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक आहे. त्यातील दोन सुरक्षारक्षक दिवसा, दोन रात्री, तर एक बदलीच्या दरम्यान काम करतो. मात्र, बंधार्‍यावर 24 तास नागरिकांची रहदारी असण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांची ही व्यवस्था तोकडी पडते. त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत.

काय आहेत समस्या?
तलावामध्ये छत्रपती शिवराय पुतळा कृत्रिम बेटावर दर्शन व स्वच्छतेसाठी घेऊन जाणारी नाव खूप जीर्ण झाली आहे.
नाव चालविण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित चालक नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक किंवा मासेमारी कंत्राटदार यांचे मजूर यांची मदत घ्यावी लागते.

पुरेशा लाइफ जॅकेटचा अभाव.
शिवजयंती व उत्सवानिमित्त लोकप्रतिनिधी व मनपा अधिकारी देखील असाच धोकादायक नावेतून प्रवास करतात.
स्वच्छता कामगारांना तर नित्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते.
कात्रज तलावाच्या पर्यटनाला अवकळा आली असून, कोट्यवधी निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांकडे मनपा प्रशासन लक्ष देणार का? हे येणार्‍या काळात पाहावे लागणार आहे.

कात्रज तलाव परिसरात जागोजागी मार्गदर्शक सूचनाफलक नाहीत. तरुण पाण्यात प्रवेश करीत असताना सुरक्षारक्षक काय करीत होते? नावेतून लाइफ जॅकेटशिवाय पाण्यात प्रवेश कसा दिला जातो? या दुर्घटनेला जबाबदार कोण? अपुर्‍या सुरक्षाव्यवस्थेचा एक तरुण बळी ठरतो. तरी कुणी वरिष्ठ अधिकारी फिरकले नाहीत. मात्र, कोणतीही उपाययोजना केली नसल्याने गेंड्याचे कातडे परिधान केलेल्या उद्यान विभाग व मनपा प्रशासनाला जाग तरी कधी येणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

कात्रज तलावात घडलेली घटना दुर्दैवी असून, वरिष्ठांना माहिती दिली. तलाव क्षेत्राच्या दृष्टीने सुरक्षारक्षक कमी आहेत. उद्यान विभागाच्या वतीने परिसराच्या सुरक्षेसाठी अधिकच्या सुरक्षारक्षकांची मागणी वेळोवेळी केली आहे. यापुढे अशी दुर्घटना होऊ नये, यासाठीची खबरदारी घेतली जाईल.- संतोषकुमार कांबळे, उद्यान अधीक्षक

कात्रज तलाव परिसरात छत्रपती शिवराय व संभाजी महाराज यांचे पुतळे आहेत. स्वच्छता राखावी तसेच सुरक्षेअभावी दुर्घटना होऊन पावित्र्य भंग पावू नये, याची खबरदारी उद्यान विभागाने घेतली पाहिजे. तलावाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारच्या घटना सातत्याने होतात. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. – दीपक गुजर, माजी सरपंच

SCROLL FOR NEXT