पुणे: मी आयटी कंपनीत नोकरी करतो. माझी शास्त्रीय संगीत शिकण्याची खूप वर्षांपासून इच्छा होती. पण, कामातून वेळ काढणे कठीण होत होते. नंतर ऑनलाइन संगीतवर्गाची माहिती मिळाली अन् माझा शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रवास सुरू झाला.
मी आठवड्यातून दोनदा ऑनलाइन वर्गाद्वारे शास्त्रीय गायन शिकत आहे. दुसर्या देशात राहूनही आपल्या देशातील अभिजात संगीत शिकता येत असल्याचा आनंद आहे, अशी भावना सिंगापूर येथे राहणारे विनायक मनोहर शेलार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
सध्या विनायक यांच्याप्रमाणे विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय ऑनलाइन पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत असून, संगीताने त्यांना आपल्या भारतीय संस्कृती, परंपरेशी जुळण्याची संधी दिली आहे. आजही गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षण सुरू आहे.
परंतु, काळाप्रमाणे बदलत आता ऑनलाइन पद्धतीने गुरूंकडून संगीत शिक्षण घेतले जात आहे. तेही सातासमुद्रापलीकडे. कारण, आता भारतातून थेट संगीतगुरू परदेशात राहणार्या शिष्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेत आहेत. तसेच परदेशातील अनेक भारतीय आपल्या गुरूंकडून ऑनलाइन पद्धतीने संगीत शिक्षण घेत आहेत.
अमेरिका असो वा कॅनडा... सिंगापूर असो ऑस्ट्रेलिया... अशा विविध देशांत राहणारे भारतीय आता सातासमुद्रापलीकडे राहूनसुद्धा संगीतविशारद बनले आहेत, तर अनेकांनी संगीतात प्रावीण्य मिळवले आहे. शनिवारी (दि. 21 जून) साजर्या होणार्या जागतिक संगीत दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने विविध देशांमध्ये राहून ऑनलाइन पद्धतीने शास्त्रीय संगीत शिकणार्या भारतीयांशी संवाद साधला.
अमेरिकेतील राहणारे शशांक सप्तर्षी म्हणाले, लहानपणापासून शास्त्रीय संगीत, भारतीय चित्रपटगीते कानावर पडत गेली आणि भारतीय संगीताशी आपुलकीचे नाते जुळले. पुढे नोकरीनिमित्त अमेरिकेला स्थायिक झालो. पण, शास्त्रीय संगीताची आवड मनात होतीच.
त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील बारकावे समजावेत आणि संगीताशी नाते जुळावे, यासाठी ऑनलाइन वर्गाद्वारे संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वर्गाद्वारे संवादिनी हे वाद्य शिकण्यास सुरुवात केली. माझे गुरू मला खूप चांगल्या प्रकारे ऑनलाइन पद्धतीने संवादिनीचे प्रशिक्षण देत आहेत. संगीत आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाते आणि संगीत हे आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते. त्यामुळे एका दुसर्या देशात राहूनही मला भारतीय शास्त्रीय संगीत शिकता येत असल्याचा आनंद आहे.
शास्त्रीय अन् सुगम संगीत शिकण्याकडे अधिक कल
पुण्यातील अनेक संस्थांसह गुरूंकडून संगीत शिक्षण दिले जात आहे. विविध अॅपद्वारे लाइव्ह पद्धतीने त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, फ—ान्स, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी देशांत राहणारे भारतीय संगीत शिक्षण घेत आहेत.
खासकरून शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकण्याकडे अधिक कल आहे. शास्त्रीय संगीतातील गायकीतील विविध पैलू असो वा त्यातील बारकावे, असे सारे काही त्यांना शिकवले जात आहे. परदेशात राहणारे भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेतच; पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यांतील नागरिकांचा संगीत वर्गांना प्रतिसाद आहे.
नोकरीनिमित्त आणि व्यवसायानिमित्त विविध देशांमध्ये राहणारे अनेक भारतीय नागरिक संगीत शिक्षणाकडे वळले आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन वर्गाद्वारे ते संगीत शिकत असून, आपल्या मातीशी रुजलेले अस्सल भारतीय संगीत शिकण्याकडे त्यांचा रस वाढला आहे. परदेशात राहणार्यांना आम्ही संगीत शिक्षण देत आहोत. ऑनलाइन वर्गांना चांगला प्रतिसाद आहे.- पंडित प्रमोद मराठे, प्राचार्य, गांधर्व महाविद्यालय