पुणे: राष्ट्रीय सुरक्षितेतच्या बाबतीत भारतीय सैन्यदल सक्षम आहे. लष्करी ताकदीच्या बाबतीतही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारतीय सेना मजबूत आहे. जगातल्या उत्तम सेनांपैकी एक सर्वोत्तम सेना म्हणून आपली भारतीय सेना आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हल्ला असो, मग तो जमिनीवरचा की, हवाईमार्गे, नाहीतर समुद्रमार्गे असो सर्व प्रकारचे हल्ले परतवू शकणारी आपली भारतीय सेना आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पुण्यातील समर्थ भारत सक्षम सेना या संकल्पनेंंतर्गत दक्षिण कमांडच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित, नो युवर आर्मी या तीनदिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जन. धीरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, नो युवर आर्मी या तीनदिवसीय मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे. शिवाय भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या दृष्टीने तरुणांना प्रोत्साहन देणारा हा मेळावा आहे. भारत देशाने संंरक्षण क्षेत्रात सुरक्षितेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल त्यांनी सैन्यदलाचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने भारतीय सैन्याचे साहस, शौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणार्या छायाचित्रांचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच, परिसरातील विविध संरक्षणविषयक अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडे, उपकरणांची पाहणी करून माहिती घेतली.
लष्करी जवानांनी मार्शल आर्ट्सचे सादरीकरण केले. तसेच, गुरखा बटालियनच्या जवानांनीही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. शीख समुदायाच्या गटका संघातर्फेही युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके सादर केली. बेळगावच्या मराठा लाइफ इन्फ्राट्रीच्या जवानांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी प्रशिक्षणार्थी श्वानपथकांनीही युद्धभूमीवर शत्रूशी लढताना आवश्यक कौशल्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरले.