पुणे

पुणे : विद्यापीठात विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे

अमृता चौगुले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक फटका बसल्याने विविध संघटनांनी सर्वच शुल्कात सवलत देण्याची मागणी केल्यानंतर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांनी सर्व विद्यापीठांना त्याबाबत आदेश दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून विद्यापीठाने शुल्कवाढ लागू केली. त्यामुळे कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.

कृती समितीसोबत आंदोलनाच्या पूर्वसंध्येला (दि.10) कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता, उपकुलसचिव, वसतिगृह प्रमुख यांची प्रदीर्घ चर्चा झाली. सर्व मागण्यांबाबत लेखी देण्यास प्रशासनाला नकार दिला. त्यानंतर रात्री दिलेल्या लेखी पत्रात स्पष्टता नसल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी तीन दिवस भरपावसात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन केले. त्यानंतर पीएचडीचे 5 हजार, तर पदव्युत्तर पदवीचे 4 हजार 50 रुपयांचा परतावा विद्यार्थ्यांना मिळत आहे.

मात्र, त्यानंतर पुन्हा स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी व इतर अनेक शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनात राष्ट्र सेवा दल, युक्रांद, एनएसयूआय, एनएपीएम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एसएफआय, रिजनल ख्रिश्चन सोसायटी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, रिपब्लिकन युवा मोर्चा, लोकायत, मालसा यांच्यासह पक्ष संघटना सहभागी झाल्या आहेत.

SCROLL FOR NEXT