इंदापूर : इंदापूर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने अवघ्या दोन तासांच्या आत 8 लाख 60 हजार रुपये किमतीच्या चोरीचा पर्दाफाश करत 7 सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले. ही धडाकेबाज कारवाई इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.(Latest Pune News)
समाधान राजकुमार मदने (वय 22), प्रणिल राजकुमार मदने (24), मयूर राजाराम वायदंडे (वय 18, तिघेही रा. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर), गणेश दत्तात्रय खंडागळे (वय 22, रा. माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), मनोज संतोष मंडले (वय 19, रा. वनवास माची, ता. कराड, जि. सातारा) आणि प्रशांत राजेंद्र जाधव (वय 19, रा. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
निरा-नरसिंहपूर (ता. इंदापूर) हद्दीतील भीमा नदीवरील शेवरे बंधाऱ्यावरून 41 लोखंडी बर्गे चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत गोपनीय माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक कोकणे यांनी विविध तपास पथके तयार करून रात्रगस्त करणाऱ्या अधिकारी-अंमलदारांना सूचना दिल्या. सापळा रचून सहायक पोलिस निरीक्षक अजित बिरादार, किरण चंदनशिवे, जगन्नाथ कळसाईत, आरिफ सय्यद, विनोद लोखंडे, गणेश डेरे, प्रकाश माने, भरत जाधव, तुषार चव्हाण आणि सहकाऱ्यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत सापळा रचून चोरट्यांचा पाठलाग केला. युनिकॉर्न मोटारसायकलवरील तीन चोरटे आणि पिकअप जिपमधील तीन चोरटे अशा एकूण सहा जणांना त्यांनी पकडले. एक चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
या गुन्ह्यांतील मुद्देमाल 41 लोखंडी बर्गे, एक पिकअप, एक युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 8 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर केवळ दोन तासांच्या आत ही चोरी उघडकीस आणत इंदापूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या दक्षतेचा आणि वेगवान प्रतिसादाचा ठसा उमटवला आहे.
तपासादरम्यान अटक आरोपींनी इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत आणखी तीन चोरींची कबुली दिली. याखेरीज अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूर, मंगळवेढा या ठिकाणीही त्यांनी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.