Indapur Gram Panchayat Elections Pudhari
पुणे

Indapur Gram Panchayat Elections: आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची लगबग; गावागावांत निवडणुकीची चाहूल

इंदापुरात ८१ ग्रामपंचायतींच्या रिंगणात 'यंदा संधी आपलीच'चा नारा

पुढारी वृत्तसेवा

जावेद मुलाणी

इंदापूर: राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यपदाचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण राजकारण तापले आहे. इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच गावखेड्यात इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर आता सदस्य आरक्षणावर हरकती-सूचनांचा टप्पा बाकी असून, त्यानंतर प्रचाराला खरा जोर येणार आहे.

तालुक्यात पारावर, चावडीसमोर, मोठ्या जुन्या झाडाच्या सावलीखाली आणि शेताच्या बांधावर सध्या केवळ निवडणुकीचीच चर्चा रंगली आहे. 'आपल्या वार्डात कोणते आरक्षण पडले?' 'सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे का?' '

ओबीसीच्या किती जागा आहेत?' याची चाचपणी जोरात सुरू आहे. आरक्षण अनुकूल पडल्याने अनेकांनी 'यंदा आपणच सरपंच, आपणच मेंबर होणार' असा निर्धार करत गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

एकूणच आरक्षण जाहीर झाल्याने गावखेड्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, पुढील काही दिवसांत प्रचाराचा धुरळा उडणार यात शंका नाही. इंदापूर तालुक्यातील ८१ गावांचा कारभारी कोण होणार, याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता प्रतीक्षा आहे ती फक्त निवडणुकीच्या तारखांची.

महिला, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्याने पारंपरिक घराणेशाहीला छेद जाणार आहे. सुशिक्षित युवक, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या व शेतकरीपुत्र मोठ्या संख्येने रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आमचं ठरलंय...आमचं फिक्स असतं... तर यंदा आम्हीच .. 'गावचा कारभार पारदर्शक करू, डिजिटल ग्रामपंचायत करू' असा नारा देत युवकांनी व्हॉट्सॲप ग्रुप व फेसबुकद्वारे प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.

जेवणावळींचा धडाका, वैयक्तिक संपर्कावर भर

सायंकाळी गल्लीबोळात बैठका, शेतात खलबते आणि रात्री जेवणावळींचे आयोजन वाढले आहे. 'एकदा संधी द्या, गावाचा विकास करतो' असे सांगत इच्छुक मतदारांना आपलेसे करत आहेत. यंदा सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने केवळ पॅनेलवर विसंबून न राहता उमेदवारांचा वैयक्तिक संपर्कावर भर दिसत आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकारण अधिकच चुरशीचे झाले आहे.

जुन्या-जाणत्यांची कोंडी

आरक्षणामुळे अनेक वर्षे सत्ता गाजवणाऱ्या जुन्या-जाणत्यांची मात्र कोंडी झाली आहे. पारंपरिक वॉर्ड राखीव झाल्याने काहींना दुसऱ्या वॉर्डातून नशीब अजमावावे लागणार आहे. त्यामुळे नव्या-जुन्यांमध्ये सुप्त संघर्षाची ठिणगी पडली आहे, तर काहींना यंदा वर्गात जागा कमी झाल्याने थांबावे लागणार आहे.

प्रशासन सज्ज

राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण व मतदान केंद्र निश्चितीची कामे प्रशासनाने हाती घेतली आहे. एकूणच प्रशासन देखील या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT